• Sat. Sep 21st, 2024

उत्तरे देताना शिक्षकांची तारांबळ! प्रेरणा परीक्षेची काठिण्य पातळी अधिक; १० टक्केच उपस्थिती

उत्तरे देताना शिक्षकांची तारांबळ! प्रेरणा परीक्षेची काठिण्य पातळी अधिक; १० टक्केच उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘पर्वतीय प्रदेशात स्वयंपाक करणे कठीण आहे कारण’, ‘वाहनांमध्ये बसवलेल्या रियर व्ह्यू मिररद्वारे निर्माण केलेले मॅग्निफिकेशन’, ‘स्वच्छ आकाश निळे दिसते कारण’ अशा प्रश्नांची उत्तरे सोडविताना शिक्षकांची रविवारी अक्षरश: तारांबळ उडाली. शिक्षक प्रेरणा परीक्षा रविवारी मराठवाड्यातील ९३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पहिल्या दिवशी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्र अशा विषयांचा पेपर झाला. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा ३० व ३१ जुलै रोजी घेतली जात आहे. शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी या हेतूने परीक्षा घेतली जात असल्याचे सांगण्यात येते. शिक्षकांसाठी पहिल्या दिवशी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात आला. सोमवारी गणित, इंग्रजी, इतिहास व भूगोल विषयाचे पेपर होणार आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजेपासून शिक्षक परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून २६ हजार ८७१ शिक्षकांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी २ हजार ८८६ शिक्षकांनी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर दिला. रसायनशास्त्राचा पेपर २ हजार ८२६ शिक्षकांनी तर २ हजार ८१३ शिक्षकांनी जीवशास्त्र विषयाचा पेपर दिला. आठ जिल्ह्यांत ९३ परीक्षा केंद्रावरुन परीक्षा घेतली जात आहे. प्राथमिक शिक्षक, इतर विषयाच्या शिक्षकांना प्रश्नांची उकल करणे अडचणीचे गेले. काहींनी सांगितले की, विषयनिहाय परीक्षा, अभ्यासक्रम दिला असता तर अधिक चांगल्या पद्धतीने परीक्षेची तयारी करता आली असती.

५० प्रश्न, १ तासाचा वेळ

शिक्षक प्रेरणा परीक्षेत एका विषयाला एक तासाचा कालावधी देण्यात आला आहे. एका विषयाचे पन्नास प्रश्न विचारण्यात आले असून यात निगेटीव्ह मार्किंग लागू आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी ०.२५ गुण वजा करण्यात येणार आहे. ५० प्रश्न सोडविण्यासाठी तासाभराचा कालावधी देण्यात आला असला तरी प्रश्न अधिक कठिण असल्याने योग्य उत्तरे शोधणे अडचणीचे ठरल्याचे शिक्षकांनी सांगितले. प्रश्नांमध्ये दूरच्या उंच इमारतीची पूर्ण लांबीची प्रतिमा कोणता आरसा वापरून नक्कीच पाहता येईल, ‘स्वच्छ आकाश निळे दिसते कारण’ अशा स्वरूपाची प्रश्न होती.
आजपासून शिक्षकांची ‘परीक्षा’; मराठवाड्यातील २६,४३० जण देणार प्रेरणा परीक्षा
अशी होती उपस्थिती..
जिल्हा… नोंदणी केलेले शिक्षक… उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर ३१८९ ४५७
जालना १४७५ २७०
परभणी ६७७ ३८२
हिंगोली ४२०१ ३७३
नांदेड ४७४३ ४९३
बीड ७७१७ ५९६
लातूर ४२५ १९०
धाराशीव ४४४४ ५२

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप थोडे कठीण वाटले. प्राथमिक शाळेमध्ये मी, कार्यरत आहे. त्यावर आधारित प्रश्नांचे स्वरूप असते तर प्रश्न सोडविताना अडचण झाली नसती. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ठरविताना याचा विचार व्हायला हवा होता.-शशिकांत पाटील, शिक्षक, चाचा नेहरू प्राथमिक विद्यालय

मी, शाळेत इंग्रजी विषय शिकवतो. अशावेळी इतर विषयांची परीक्षा देणे अडचणीचे आहे. त्यात एनसीईआरटी पाठ्यपुस्तकातील प्रश्नही काही होते. विषयनिहाय परीक्षा झाली असती, तर अधिक प्रभावी ठरली असती. त्यासह शिक्षकांना तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता.सुधाकर गुंजाळ, अमनविश्व हायस्कूल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed