• Mon. Nov 25th, 2024

    दादा कोंडकेंच्या लोकप्रिय चित्रपटांबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोणाकडे सोपवले जाणार प्रिंट?

    दादा कोंडकेंच्या लोकप्रिय चित्रपटांबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोणाकडे सोपवले जाणार प्रिंट?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांच्या १२ लोकप्रिय चित्रपटांच्या प्रिंट पॉझिटिव्ह/निगेटिव्हज या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट कंपनीकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने फिल्म एंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन फिल्म लॅबारेटरीजना नुकतेच दिले.

    उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे दादांच्या या चित्रपटांवर हक्क सांगणाऱ्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानचे विश्वस्त हृदयनाथ कडू देशमुख व उषा चव्हाण यांना धक्का बसला आहे. त्यांनी याप्रश्नी पुण्यातील न्यायालयात दोन्ही लॅबविरोधात दावा दाखल केला आहे. त्यामुळे ‘एव्हरेस्ट’ने उच्च न्यायालयात दावा दाखल करतानाच एक अर्ज केला होता. ‘त्या १२ चित्रपटांवर आमचाच स्वामित्व हक्क असल्याचे जाहीर करावे आणि त्यांच्या प्रिंट प्रतिष्ठानच्या विश्वस्तांकडे देण्यास मज्जाव करावा’, अशी विनंती कंपनीने अर्जात केली होती. त्या अर्जावरील सुनावणीअंती न्या. रियाझ छागला यांनी वरील अंतरिम आदेश दिला आणि विश्वस्तांच्या म्हणण्याबाबत २३ ऑगस्टला सुनावणी ठेवली. ‘एव्हरेस्ट’ला दिलासा का? ‘दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले. त्यापूर्वीच २ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी आपले मृत्यूपत्र तयार करून आपली बहीण लीलाबाई मोरे यांच्या स्नुशा माणिक मोरे यांच्याकडे चित्रपटांचे हक्क सोपवले होते. यामध्ये सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडु हवालदार, बोट लावीन तिथे गुदगुल्या, आली अंगावर, सासरचे धोतर, मुका घ्या मुका आणि अंधेरी रात में दिया तेरे हाथ में (हिंदी) या चित्रपटांचा समावेश होता.

    भीमा कोरेगावप्रकरणी गोन्साल्विस अन् फरेरांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, पण…
    दादांच्या मृत्यूपत्राबाबत पुणे न्यायालयाने तपासणीअंती २००८मध्ये प्रमाणपत्रही दिले होते. त्यामुळे संपूर्ण हक्क हे माणिक मोरे यांच्याकडे होते. त्यांनी १० ऑगस्ट २०२२ रोजी ते आमच्याकडे दिले होते. परिणामी प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या दाव्यात अर्थ नाही’, असे म्हणणे ‘एव्हरेस्ट’ने ज्येष्ठ वकील आशीष कामत यांनी मांडले. तर ‘उच्च न्यायालयाने एव्हरेस्ट कंपनीला दिलासा दिल्यास पुणे न्यायालयातील दाव्यातील सुनावणीत अडथळा निर्माण होईल’, असे म्हणणे विश्वस्तांच्या वकिलांनी मांडले. मात्र, दादांच्या मृत्यूपत्राप्रमाणे मूळ स्वामित्व हक्क हे माणिक यांच्याकडे होते, हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने तूर्त प्रिंट ‘एव्हरेस्ट’कडे द्यावेत, असे न्या. छागला यांनी अंतरिम आदेशात स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *