• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यातील IITMने रचला सोलापुरात इतिहास; ढगांवर क्षार फवारणीनंतर धो-धो पाऊस बरसला

    पुण्यातील IITMने रचला सोलापुरात इतिहास; ढगांवर क्षार फवारणीनंतर धो-धो पाऊस बरसला

    पुणे : सोलापूर जिल्ह्यात पार पडलेले कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी झाल्याचा निष्कर्ष पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजी’च्या (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञांनी काढला आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचा अहवाल दिल्ली येथे नुकताच प्रसिद्ध केला. विमानांमधून विशिष्ट प्रकारच्या ढगांमध्ये क्षारांची फवारणी केल्यानंतर पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे सोलापूरच्या प्रयोगांमधून सिद्ध झाले.

    ‘आयआयटीएम’च्या पुढाकाराने २००९मध्ये कायपिक्स हा प्रकल्प सुरू झाला. प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात २०१८-१९ या दोन वर्षांमध्ये मान्सून काळात सोलापूर जिल्ह्यात प्रत्यक्ष कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले. त्यासाठी अमेरिकेवरून दोन विमाने मागवण्यात आली होती. एका विमानाद्वारे ढगांमध्ये क्षारांची फवारणी; तर पाठोपाठ येणाऱ्या दुसऱ्या विमानाद्वारे ढगांमध्ये घडणाऱ्या प्रक्रियांच्या नोंदी घेतल्या गेल्या. सोलापूर जिह्यात १३० ठिकाणी बसवण्यात आलेल्या पर्जन्यमापकांच्या साह्याने क्षारांच्या फवारणीनंतर किती वेळात, कोणत्या भागांत आणि किती पाऊस पडतो याची पडताळणी करण्यात आली.

    या प्रयोगांच्या निष्कर्षांबाबत कायपिक्स प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. तारा प्रभाकरन यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘कृत्रिम पावसाचे प्रयोग जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्णतः वैज्ञानिक पद्धतीने पार पडले. त्यासाठी रडारचा उपयोग, न्यूमेरिकल मॉडेल आणि रँडम सॅम्पलिंगची पद्धत वापरण्यात आली. मान्सून काळात नैसर्गिकरीत्या पाऊस सक्रिय नसताना आम्ही निवडलेल्या काही ढगांमध्ये क्षारांची फवारणी करण्यात आली. काही ढगांमध्ये क्षारांची फवारणी केली नाही. दोन्ही प्रकारच्या ढगांमधून ज्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो तेथील पर्जन्यमानाच्या नोंदी तपासण्यात आल्या.’

    ‘मान्सून काळात पाण्याचे विशिष्ट प्रमाण असलेल्या आणि वरच्या दिशेने वाढणाऱ्या ढगांमध्ये ठरावीक वेळेत क्षारांची फवारणी केल्यास पावसाच्या प्रमाणात वाढ होते, हे आमच्या प्रयोगांतून सिद्ध झाले. विमानांद्वारे ढगांमध्ये क्षारांची फवारणी केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात बसविण्यात आलेल्या ४३ पर्जन्यमापकांवरील नोंदींनुसार पावसाचे प्रमाण ४६ टक्क्यांनी वाढले; तर सी बँड रडारच्या नोंदींनुसार १०० वर्ग किलोमीटर क्षेत्रातील पावसामध्ये १८ टक्के वाढ झाली. आम्ही लावलेल्या अंदाजानुसार प्रत्येक उड्डाणातून झालेल्या क्षारांच्या फवारणीनंतर सुमारे ८६७ दशलक्ष लिटर पाणी जमिनीवर आले. ढगांची नेमकी माहिती असेल, योग्य कार्यपद्धती वापरली, तर कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होतो आणि तो किफायतशीरही आहे, हे आमच्या प्रकल्पातून सिद्ध झाले,’ असेही डॉ. तारा म्हणाल्या.

    देशातील मोठा भूभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो; तसेच दुष्काळाच्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठीही कृत्रिम पावसाचा पर्याय योग्य असल्याचे कायपिक्स प्रकल्पातून सिद्ध झाले. २००९पासून ‘आयआयटीएम’मधील अनेक शास्त्रज्ञांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे भारतीय ढगांचे अंतरंग समोर आले आणि कृत्रिमरीत्या पावसात वाढ करण्याची वैज्ञानिक पद्धतही समजली- डॉ. आर. कृष्णन, संचालक, आयआयटीएम
    मराठवाड्यात पाणी टंचाईचे सावट; विभागातील ‘या’ पाच जिल्ह्यांत अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम
    असा झाला सोलापूरच्या कृत्रिम पावसाचा प्रयोग

    – सी बँड रडारच्या साह्याने दोन वर्षांमध्ये, मान्सून काळात विविध दिवशी पाण्याचे विशिष्ट प्रमाण असलेले एकूण २६७ ढग ओळखण्यात आले.
    – त्यांच्या अभ्यासासाठी दोन विमानांची प्रत्येकी १०३ उड्डाणे झाली.
    – निश्चित केलेल्या १४५ ढगांमध्ये एका विमानाद्वारे ‘कॅल्शियम क्लोराइड’च्या क्षारांची फवारणी करण्यात आली. १२२ ढगांमध्ये केली नाही. सर्व ढगांमधील प्रक्रियांचा दुसऱ्या विमानाद्वारे अभ्यास करण्यात आला.
    – या सर्व ढगांचे पावसाचे क्षेत्र ओळखून त्या भागातील १३० पर्जन्यमापकांवर पावसाच्या नोंदी घेण्यात आल्या; तसेच रडारच्या साह्याने सोलापूरच्या १०० वर्ग किमी क्षेत्रातील पावसाच्या नोंदी घेण्यात आल्या.
    – कायपिक्सच्या चौथ्या टप्प्यात वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि संशोधक अशा २५ जणांचा सहभाग होता. या संशोधनाचे निष्कर्ष लवकरच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed