आज २९ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पातुर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. किरण अर्जुन बळकर (१९) ही २७ जुलै रोजी रात्री शौचालय जाते म्हणून घरून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. परिसरात तिचा शोध घेण्यात आला आहे. मात्र कुटुंबियांना तिचा कुठलाही सुगावा लागला नव्हता. अखेर कुटुंबियांनी तिची बेपत्ता असलेली तक्रार पातुर पोलिसात दाखल केली. पातुर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. परंतु आज २९ जुलै रोजी पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात किरणचा मृतदेह दिसून आला. गावकऱ्यांनी याची माहिती लागलीच पातूर पोलिसांना दिली.
त्यानंतर पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, एसडीपीओ विपुल सोळंकेंसह आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. किरण बळकर या १९ वर्षीय तरुणीचा हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला असून तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण तिच्या कानावर जखमा असल्याचं दिसून येत आहे. आधी गळा आवळला नंतर तिचे हात बांधून ठेवले असल्याचा अंदाज पोलिसांकडून घटनास्थळी वर्तवण्यात येत होता. तरीही किरणच्या मृत्युचे मूळ कारण अद्याप समोर आलं नाही आहे. वैद्यकीय अहवालानंतरच तिच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल असेही पोलीस सांगतात.
घटनेची माहिती मिळताच ठसेतज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झालं होतं. घटनास्थळाचा पंचनामा तसेच पाहणी सुरू असताना दोन वेळा गावातीलच गजानन बळकार यांच्या घराजवळ श्वान गेले आहे. गजानन याचे किरणच्या कुटुंबियांसोबत वाद असल्याचे समोर आले. सद्यस्थितीत पोलिसांना गजानन संशय असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तरी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेतलं आहे. जर किरणची हत्या झाली असेल तर ही हत्या कोणी केली? त्यामागील नेमकं कारण काय? या सर्व गोष्टींचा तपासही पातुर पोलीस करत आहेत.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सखोल माहिती घेतली असून किरण हे शेतमजूराची आणि एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे. किरणचा मृत्यू हा सर्वांसाठी धक्कादायक ठरला आहे, याचा सखोल तपास करण्यात यावा, असेही पोलिसांना सुचना दिल्या आहे. अधिवेशनात हा मुद्दा मांडून संबंधित आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई म्हणजे शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील करणार असल्याचे ते म्हणाले.