जालना जिल्ह्यातील परतूर येथील साखर कारखान्यासमोरून जात असताना दामोदर शेंडगे यांनी कारखान्यात सोनेरी गुच्छ झाडे पाहिली. तेव्हा ही कुठली शोभिवंत झाडे याची उत्सुकता त्यांना आल्याने त्यांनी कारखान्यात जाऊन या झाडाबद्दल विचारपूस केली असता ही शोभेची झाडे नसून खजुराची झाडे असल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. खजुराची झाडे जर इथे टिकू शकतात तर मग आपल्या शेतीत लावायला काय हरकत आहे. या विचाराने त्यांनी ही रोपे कुठून आणली, याची विचारपूस केली. ती रोपे ज्यांनी दिल्या त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला आपली शेती दाखवली आणि या मातीत हे पीक येईल का असा प्रश्न विचारला. त्या व्यक्तीने इथल्या मातीत छान पीक येईल, असा विश्वास देताच दामोदर शेंडगे यांनी आपल्या मुलांसोबत चर्चा करून खजुराची शेती करायचीच हे ठरवले.
एवढ्यावरच न थांबता ते स्वतः मोठी पीकअप गाडी घेऊन गुजरातच्या कच्छ भागात गेले. स्वतःच्या डोळ्यांनी तिथली शेती पाहून सरळ १८० खजुराची टिश्यू कल्चर रोपे घेऊनच आले. त्यावेळेस म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी रोप विकत घेतले. तेंव्हा एका रोपाचा भाव होता ३२५०/- प्रती नग. आपल्या ३ एकर जमिनीवर १२ ऑक्टोबर २०१९ रोजी २५ बाय २५ च्या अंतरावर ही २०० रोपांची लागवड करण्यात आली. त्यावेळेस फक्त शेणखताचा वापर करण्यात आला. वर्षातून २ वेळेस फक्त शेणखत देण्यात आले. कुठलाही रासायनिक फवारा, कुठलेच खत, औषधाची मात्रा देण्याची गरज पडली नाही. ३८ महिन्यानंतर या झाडाला मोहर आला. १ जानेवारी २०२३ ला झाडावर फुले आली. फळं यायला सुरुवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही पिकलेली फळे विकण्यासाठी तयार झाली. पीक इतके छान बहरले की फळाच्या पहिल्या बाजारातच एका झाडावर ५० किलो ते १ क्विंटल इतका माल निघायला लागला. आता दरवर्षी फळांचे प्रमाण वाढतच जाणार असल्याचे दामोदर शेंडगे सांगतात.
आलेल्या खजुराची विक्री करण्याची जास्त मरमर देखील त्यांना करावी लागली नाही. पिकेल तिथेच विकेल हे सूत्र त्यांनी लक्षात ठेवले. सरळ आपल्या शेतासमोर स्टॉल लावून विक्री सुरू केली. शेंडगे यांचे शेत रस्त्यावरच असल्याने त्यांचा स्टॉल पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कुतूहल वाटल्याने काय फळ म्हणून चौकशी केली की दामोदर जी त्यांच्या हातात एक फळ खाण्यासाठी द्यायचे. ते फळ खाल्यानंतर येणारा ग्राहक अर्धा/१ किलो खजूर घेऊन जातो म्हणजे जातोच. त्यामुळे आतापर्यंत काढलेला ४ ते साडे चार टन खजूर त्यांनी २००/- प्रतिकिलो भावाने विक्री झाला. या विक्रीतून त्यांना आता पर्यंत ७ ते ८ लाखापर्यंत उत्पन्न झालेले असून अजूनही झाडावर शिल्लक असलेल्या खजुराच्या विक्रीतून लाखभर रुपये मिळणार आहेत.
विशेष म्हणजे दामोदर शेंडगे यांचा फक्त ७ वी पास झालेला मोठा मुलगा जगदीश सगळ्या शेतीच व्यवस्थापन पाहतो. वडिलांचा अनुभव आणि शेतीतला अभ्यासाचा पुरेपूर उपयोग करून घेत जगदीश खजुराच्या शेतीचे व्यवस्थापन बघतात. शेंडगे यांचा लहान मुलगा मात्र सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो हैद्राबाद ला मोठ्या कंपनीत काम करतो. फक्त सातवी शिक्षण झालेला मोठा मुलगा वडिलांसोबत शेतीत जोरदार उत्पन्न कमावत असल्यामुळे लहान मुलगा हैद्राबादमध्ये नोकरी करतो. तो दरवर्षी १२ लाख रुपये जरी कमावत असला तरी त्याच्या ३० वर्षाच्या नोकरीत तो ३ कोटी ६० लाख रुपये कमावेल. इथे शेतीतल्या मुलाचा विचार केला तर सगळ्या शेतीतून त्याच्या ३ ते ४ पटीने उत्पन्न मिळत आहे, असं सांगत वर्षाकाठी आपल्या २० एकर शेतीत ऊस, मोसंबी सह इतर पिकातून ३० ते ४० लाखाची उलाढाल होत असल्याचं शेंडगे सांगतात. त्यामुळे प्रायोगिक आधुनिक शेती ही फायद्याचीच असल्याचंही ते म्हणतात.
दामोदर शेंडगे यांनी केलेला हा आधुनिक शेतीतला हटके प्रयोग तुफान यशस्वी झाल्याने आता इतरही शेतकऱ्यांचे पाय शेंडगे यांची खजूर शेती पाहण्यासाठी वळू लागले आहेत. जालन्यासारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या भागात इराण इराकची खजूर शेती फुलते आहे. ही पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी संधी असेल यात वाद नाही. आपल्या पारंपरिक पिकांसोबत थोड्याफार क्षेत्रावर याची लागवड करून उत्पन्नाचा चांगला मार्ग यातून निश्चितच मिळेल.