येत्या सोमवारी किंवा मंगळवारी राज्यसभेत केंद्र सरकारचं दिल्ली पोस्टिंगबाबतचं वादग्रस्त विधेयक येण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या पोस्टिंगबाबत अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही केंद्र सरकारनं एक अध्यादेश काढून पुन्हा स्वत: कडे घेतले आहेत. त्याच संदर्भातलं हे विधेयक आहे. यासंदर्भात विरोधकांची गणिताची रणनीती सुरु सुरु असताना शरद पवार मात्र पुण्यात असणार आहेत. त्यामुळे नेमकं शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पुण्यात एकाच मंचावर असतानाच केंद्र सरकार हे विधेयक मतदानासाठी आणण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शरद पवार यांची मोठी गोची होणार आहे.
दुसरीकडे, गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे याच विधेयकाच्या संदर्भात देशभरातील अनेक नेत्यांच्या भेटी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने याआधीच आपला पाठिंबा केजरीवाल यांना दिलेला आहे. मात्र जर शरद पवारांनी राज्यसभेत मतदानाला उपस्थित न राहता मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली तर देशभरातील भाजप विरोधी आघाडीत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच ही वेळ साधून पवारांची गोची करण्याची संधी केंद्र सरकार सोडणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात नेमकं काय सुरु आहे याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम असताना आता पवार हे दोन्ही कार्यक्रम एकत्रच आले तर कशाला प्राधान्य देतात यावर पुढील गणितं अवलंबून असणार आहेत. तर पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी इंडियामधील नेते आणि पुण्यातील स्थानिक नेते हे देखील आग्रही असल्याची माहिती आहे.
चंद्रकांत पाटलांची पुणे मेट्रोमधून सफर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जोडले जाणार असून पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडत असल्याने पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी मेट्रो चालविणाऱ्या महिला चालकाशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
असा आहे मेट्रो मार्ग
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. डेक्कन, शिवाजीनगर आणि पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल सेवेबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे.