२५ वर्षीय माधव बोकारे हा आपल्या आई – वडील आणि भावासोबत लिंबगाव हद्दीतील रहाटी येथे राहतो. त्याला दारूचं व्यसन होतं. काही वर्षापूर्वी आई वडिलांनी माधव याचं नातेवाईकातील मुलीसोबत लग्न लावून दिले होते. मात्र, लग्नानंतरही तो दारूच्या अधीन गेला होता. नेहमी दारू पिऊन पत्नीसोबत वाद घालायचा. शेवटी आई वडिलांनी आपल्या सुनेला माहेरी पाठवले. याचाच राग मुलाला होता.
“माहेरी गेलेल्या पत्नीला आणा,” म्हणून तो आई – वडिलांसोबत देखील वाद घालत होता. “तू दारू पिणे सोडून दे, तेव्हा तुझ्या पत्नीला तिच्या माहेरहून इकडे आणून देतो,” असं म्हणून त्याला घरच्यांनी समजावून सांगितले. परंतु त्याने दारू पिणे काही सोडले नाही. आई – वडिलांमुळे पत्नी माहेरी गेली याचाच राग मनात धरून त्याने आई – वडील आणि भावाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि घरातील पिण्याच्या भांड्यातील पाण्यात विषारी औषध टाकले.
रात्रीच्या वेळी शिजवलेल्या अन्नाला फेस येऊन वेगळाच वास येऊ लागला. भांड्यातील पाण्याचा विषारी वास येत होता. जीवे मारण्याच्या उद्देशाने पाण्यात विष टाकल्याची बाब आई – वडिलांना समजली. मात्र, त्यानंतर माधव हा पळून गेला. “तुम्ही माझ्यविरूद्ध तक्रार केल्यास तुम्हाला जिवंत मारतो,” अशी फोनवर धमकी देखील दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
दरम्यान, दिगांबर शंकरराव बोकारे, (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली.