मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्यातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्यांचे भविष्यनिर्वाह निधी लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.), महाराष्ट्र कार्यालयामधे ठेवले जातात, त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वर्ष २०२२-२३ चे वार्षिक विवरण महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे. पोर्टलवरील https://sevaarth.mahakosh.gov.in ह्या लिंक वर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत कर्मचारी त्यांचे वार्षिक विवरण पाहू शकतात, व प्रिंट करु शकतात.
लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.) नागपूर कार्यालयामधे भविष्य निर्वाह निधी लेखे ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी काही मुद्द्यांचे अनुपालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांचे समायोजन करणे शक्य होईल.
महाराष्ट्र शासनाच्या १७ मे २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाइल क्रमांक महालेखाकार, नागपूर या कार्यालयात नोंदणीकृत करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्व कर्मचारी यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यामधे जमा अभिदान तसेच त्यांना दिलेल्या अग्रीम राशी व भविष्यनिर्वाह निधी अंतिम आहरणच्या आवेदनाची प्राप्ती तसेच त्याच्या प्राधिकृत होण्यासंबंधीचा संदेश पाठवता येऊ शकेल. अद्याप मोबाईल क्रमांक नोंदणीकृत न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक fm.mh2.[email protected] ह्या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे अधिकारी यांना पूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व सेवार्थ आयडीसह पाठवावा, असे आवाहन प्रधान महालेखाकार, नागपूर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून करण्यात आले आहे.
सर्व कर्मचाऱ्यांनी नाव व जन्म तारीख भविष्यनिर्वाह निधी विवरण पत्र तसेच सेवार्थ प्रणालीत तपासून घ्यावे. तफावत असल्यास नाव व जन्म तारीख सेवार्थ प्रणालीमधे सुधारित करून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचेमार्फत अचूक नाव व जन्मतारीख कर्मचाऱ्याच्या सेवार्थ आयडीसह [email protected] वर ईमेल करावा किंवा फॅक्स क्रमांक 0712- 2560484 वर सूचित करावे.
भविष्य निर्वाह निधी अनुसूचीमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांक, विभागाशी संबंधित सिरीज, पूर्ण नाव बरोबर असल्याची खात्री करावी. मासिक अभिदानाची राशी किंवा घेतलेले अग्रीमची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांच्या माध्यमातून कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांक, अनुसूची, प्रमाणकाची राशी अनुसूचीच्या प्रती बरोबर पाठवावी.
0000
मनीषा सावळे/विसंअ/