• Mon. Nov 25th, 2024
    माणगावात मूषक हरीण आढळलं, संपूर्ण रायगडमध्ये एकच चर्चा, वैशिष्ट्ये काय?

    रायगड: जिल्ह्यातील माणगांव बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील गजबजलेल्या परिसरात छोट्या हरणासारखा प्राणी दिसत असल्याचे त्यांनी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना फोनवरून कळविले. तात्काळ शंतनु आणि त्यांचे सहकारी मित्र शुभांकर वनारसे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी दाखल होत पाहणी केली. वन विभागाला देखील माहिती दिली, वनविभागाची टीम देखील बोलावण्यात आली परंतु हा परिसर खूप मोठा असल्याने या छोट्याशा प्राण्याचा शोध घेणे शक्य नव्हते. तरीसुद्धा शंतनु आणि टीमने परिसर पिंजून काढला मात्र प्राणी कुठेही दिसला नाही, स्थानिकांमध्ये जनजागृती करून हा प्राणी पुन्हा दिसल्यास जवळ न जाता त्वरित कळविण्याचे आवाहन करत वनरक्षक व शंतनु त्या ठिकाणाहून परतले.

    लगेच दुसऱ्याच दिवशी बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पुन्हा हा प्राणी या ठिकाणी आला असल्याची माहिती कृष्णाभाई गांधी यांनी दिली. त्यानंतर तातडीने वन्यजीव अभ्यासक शंतनू आणि त्याचा सहकारी मित्र शुभांकर तेथे पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता हा प्राणी “माउस डियर” म्हणजेच मराठीत “मूषक हरीण” किंवा “पिसोरी” म्हणून ओळखले जाणारे हरीण असल्याचे खात्रीपूर्वक कळले.

    दबक्या पावलांनी आली… माणगावांत भरवस्तीत मगर आल्यानं नागरिकांमध्ये घबराट

    चारी दिशेने लोकवस्तीने गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात हे अत्यंत लाजरे हरीण पुराच्या पाण्यामुळे चुकून अडकून राहिले असल्याचे निदर्शनास आले. परिसरात आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर आणि समोरील मुंबई-गोवा महामार्ग त्यामुळे हरिणाचा तात्काळ बचाव करणे गरजेचे असल्याने स्थानिक व गांधी परिवाराच्या मदतीनेच बचावकार्य सुरु करण्यात आले. बचावकार्यादरम्यान हे पिसोरी हरीण चक्क बाजारपेठेतील प्रजापती यांच्या राजश्री एम्पोरियम या कपड्यांच्या दुकानात शिरले. तिथे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी अथक प्रयत्नांनंतर त्या हरिणाला हळुवारपणे पकडून वनविभागाची टीम दाखल होईपर्यंत साधारण १५ मिनिटे दुकानाच्या बंद खोलीत हरिणाला शांत ठेवले.

    माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे देखील वनरक्षक वैशाली भोर,अनिल मोरे आणि वाहन चालक विवेक जाधव अश्या आपल्या टीम सोबत तात्काळ पिंजरा घेऊन पिसोरी हरीणाच्या सुखरूप बचावासाठी पोहोचले. हरिणाला दुकानातून पिंजऱ्यात सुरक्षितपणे ठेऊन लगेचच माणगांव पशुवैद्यकीय दवाखान्यात चाचणीसाठी नेण्यात आले. पिसोरी हरीण संपूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करून वनविभागामार्फत योग्य त्या नोंदी व काळजी घेत साधारण ४ किलो इतक्या वजनाच्या पूर्ण वाढीच्या या मादी पिसोरी हरिणास जवळच्याच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

    सदरचे बचावकार्य रोहा उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांवचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिदुद्ध ढगे, वनरक्षक अनिल मोरे आणि वैशाली भोर, वाहन चालक विवेक जाधव, वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर आणि सहकारी मित्र शुभंकर वनारसे व स्थानिकांच्या मदतीने करण्यात आले.

    मूषक हरिणाची वैशिष्ठ्ये काय:
    मूषक हरीण म्हणजेच पिसोरी हरीण हा अतिशय दुर्मिळ लाजरा व नेहमीच मनुष्यवस्तीपासून दूर जंगलात राहणारा वन्यजीव आहे. वेळप्रसंगी खूप चपळतेने हे हरीण पळते. अधिवासात सोडताना पिंजऱ्याचे दार उघडताच मोकळा श्वास घेत पिसोरी हरीण आपल्या मार्गाने जंगलाच्या दिशेने निघून जातानाचे दृश्य काही वेगळेच समाधानकारक होते. माणगांव बाजारपेठेतल्या जागृत स्थानिक रहिवाशांमुळे आणि गांधी परिवारामुळे हे शक्य झाले, एका अतिदुर्मिळ अशा हरीणाचे प्राण वाचून पुन्हा नैसर्गिक अधिवासात ते सुरक्षितपणे मुक्त झाल्याचे शंतनू कुवेसकर यांनी सांगितले.

    सद्याच्या पूरपरिस्थितीमुळेच वन्यजीवांची देखील वाताहत होत आहे, भर वस्त्यांमधून त्यांचा वावर आढळून येतोय. माणगांव शहरातल्या मोठ्या मगरीच्या बचावानंतर आता लगेचच हे पिसोरी हरीण बाजारपेठेत मिळाले आहे, स्थानिक नागरिकांनी अश्या प्रकारेच सहकार्य करीत वनविभागाला त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पुन्हा एकदा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांनी केले आहे.

    Red Alert for Heavy Rain : पावसाचा रेड अलर्ट, मुंबईसह या ४ जिल्ह्यांमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *