• Sat. Sep 21st, 2024

‘मुद्रा’ योजनेआडून फसवणूकीचा फंडा! सायबर चोरट्यांचं टॅलेंट पाहून हादराल, अनेकांना लावलाय चुना

‘मुद्रा’ योजनेआडून फसवणूकीचा फंडा! सायबर चोरट्यांचं टॅलेंट पाहून हादराल, अनेकांना लावलाय चुना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पंतप्रधान मुद्रा योजनेचे कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून तरुणांची आता ‘हायटेक’ फसवणूक होत असून, त्यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. काही चोरट्यांनी तर यासाठी खास अॅप्सच विकसित केली आहेत.

पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे लघुउद्योजक, दुकानदारांना शिशू श्रेणीअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत, किशोर श्रेणीअंतर्गत पाच लाखांपर्यंत, तर तरुण श्रेणीअंतर्गत दहा लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र, त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात व काही अटींची पूर्तता करावी लागते. कागदपत्रे अपूर्ण असल्यास कर्ज मिळण्यात अडचणी येतात. याचा काही ठकांकडून फायदा घेतला जातो व कर्ज देण्याच्या आमिषाने इच्छुकांची फसवणूक केली जाते. चोरट्यांकडून व्यक्ती हेरून फोन केले जातात व मुद्रा कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले जाते. संबंधित नंबरवर वैयक्तिक माहिती, आधार, पॅनकार्ड पाठविण्यास सांगितले जाते. ते पाठविल्यावर व्यक्तीला मुद्रा कर्जमंजुरीचे बनावट प्रमाणपत्र पाठवून तिचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर तिला प्रोसेसिंग पाठविण्यास सांगून गंडवले जाते. अशी अनेक प्रकरणे घडली असतानाच, गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी आता आणखी वरची पायरी गाठली आहे. त्यांनी फसवणुकीसाठी खास अॅप्सच तयार केली आहेत. ही अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, त्यांच्याद्वारे फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अॅप्सद्वारे अशी होते फसवणूक……

मुद्रा योजनेबाबत फेसबुक वा यू-ट्यूबवर जाहिरात दाखवली जाते. त्याद्वारे संबंधित अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. या अॅपमध्ये नाव, पत्ता, आधार, पॅन क्रमांक आदी माहिती भरण्यास सांगितली जाते. ती भरल्यानंतर काही तासांनी कॉलसेंटरमधून फोन येतो व तुमचे मुद्रा कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या प्रोसेसिंग फीसाठी पैसे जमा करण्यास सांगितले जाते. लोक कर्जाच्या आमिषाने रक्कम भरतात. तोपर्यंत त्यांना आलेला फोन क्रमांक बंद झालेला असतो.

ही घ्या काळजी……
* मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी जवळच्या बँकेशी संपर्क साधावा. कोणत्याही अॅप वा वेबसाइटवर वैयक्तिक माहिती भरू नये.
* कोणी फोन करून कर्ज देण्याविषयी सांगत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.
* संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच कर्जासाठी अर्ज करावा.
* कोणी झटपट, विनाकागदपत्रे, विनापडताळणी कर्ज देण्याचे आश्वासन देत असल्यास ते बनावट असल्याचे लक्षात घ्यावे.
आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरण: ३ सीएंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, दुसऱ्या गुन्ह्यात अटक होणार?
मला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. मुद्रा कर्जासाठी कागदपत्रे मागितली. ती पाठविल्यानंतर मला चौदा लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे थेट पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्रच आले. त्यानंतर प्रोसेसिंग फी म्हणून १,२५० रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगण्यात आले. हा सगळा प्रकार बनावट असल्याचे मला माहीत होते. त्यामुळे पैसे पाठविले नाहीत. मात्र, सामान्य माणसे या फसवणुकीला बळी पडू शकतात.- किरण घायदार, नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed