• Sat. Sep 21st, 2024
विधानपरिषद लक्षवेधी

राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार – प्रा. डॉ.तानाजी सावंत

मुंबईदि. २६ : राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

“सांगली येथील वैदय योगेश माहिमकर यांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांच्याकडे येत असलेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांचे रक्त सांगलीमधील वेगवेगळ्या ४ नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविलेत्यानंतर या चारही लॅबचे रिपोर्ट हे वेगवेगळे असल्याचे धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा लॅबवर शासन काय कारवाई करणार ? अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली होती.त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत बोलत होते.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले कीसांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वैद्य योगेश माहिमकर हे मागील १८  ते १९ वर्षांपासून बाहयरुग्ण विभागांतर्गत आयुर्वेदिक प्रॅक्टीस करीत आहेत. त्यांनी एकाच मधुमेही रुग्णाचे रक्तनमुने सांगलीतील चार वेगवेगळ्या नामांकित लॅबमध्ये पाठवले आणि त्या चारही लॅबमधील रिपोर्टमध्ये खूप मोठी तफावत दिसून येत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहेपरंतु त्यासंबंधी त्या कोणत्याही आस्थापनांकडे उदाहरणार्थ सिविल सर्जन किंवा महानगरपालिका यांच्याकडे कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार केली नाही. त्यामुळे या विषयाबाबत चौकशी करण्यात आलेली नव्हती. मात्र हे प्रकरण नागरिकांच्या जीविताशी निगडित असल्याने संबंधित विषयाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून यामध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना देण्यात येतील.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले कीसद्यस्थितीत पॅथॉलॉजी लॅब रजिस्ट्रेशनचा कोणताही कायदा राज्यामध्ये लागू नाही. त्यामुळे प्रयोगशाळांची नोंदणी राज्यातील कोणत्याही आस्थापनेमध्ये होत नाही.राज्यातील सर्व पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. त्यानुसार त्याबाबत एक निश्चित नियमावली तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या लक्षवेधीच्या चर्चेत विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकरभाई गिरकर, भाई जगताप,अॅड अनिल परब यांनी सहभाग घेतला.

*****

संध्या गरवारे/‍विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed