• Mon. Nov 25th, 2024

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 26, 2023
    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

    मुंबई दि. 26 : औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आवश्यक तो निधीही देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  विधान परिषदेत दिली.

    औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक निधीअभावी प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

    श्री. सामंत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याकरिता शासनाकडून 35.19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 23 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मृती वन व स्मारकाचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. अद्यापपर्यंत या प्रकल्पावर 9.40  कोटी इतका निधी खर्च झालेला आहे. या स्मारकाच्या प्रलंबित कामांच्याबाबत आजच मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

    या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

    0000

    मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

    मुंबई दि. 26 : मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

    मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता.

    श्री. सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत वाहन विराजित यंत्रसामग्रीच्या सहाय्याने यांत्रिक पद्धतीने मलनिःसारण वाहिन्यांचे परिरक्षण करण्यात येते. तसेच मोठ्या नाल्याची सफाई प्रामुख्याने यंत्रसामग्रीचा वापर करून करण्यात येते. परंतु ज्या ठिकाणी यंत्रसामग्री वापरता येणे शक्य नाही, अशा पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई अपवादात्मक परिस्थितीत कंत्राटदारांमार्फत नियुक्त केलेल्या कामगारांच्या सहाय्याने, सुरक्षिततेचे उपाय करून करण्यात येते.

    महानगरपालिकेतील 29 हजार 700 सफाई कामगारांपैकी 5 हजार 592 सफाई कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेवासदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भूखंडावर आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकास करून 12 हजार घरे बांधण्याची कार्यवाही महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

    या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन आहेर, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.

    0000

    दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना-हरकत प्रमाणपत्रांबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री शंभूराज देसाई

                 मुंबई दि. 26 : राज्यातील दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना हरकत प्रमाणपत्राबाबत जे अधिकारी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत कुठल्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येणार नाही, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

    राज्यातील दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना हरकत प्रमाणपत्रांबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

    मंत्री श्री. देसाई म्हणाले की, आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांनी माहे जानेवारी 2019 ते मार्च, 2019 या कालावधीत ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दिव्यांगांच्या शाळांना अनुदानाच्या शिफारशींच्या प्रकरणामध्ये झालेल्या वित्तीय व प्रशासकीय अनियमिततेबाबत दिनांक 9/04/2019 व दिनांक 29/04/2019 च्या पत्रान्वये संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

    या संपूर्ण प्रकरणाची एक महिन्यात नव्याने सुनावणी घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल. तसेच दिव्यांगांना शासन आपल्या दारी या योजनेंतर्गत घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र व त्याअनुषंगाने आवश्यक ते दाखले वाटप करण्यात येत असल्याची माहितीही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

    या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील आदींनी सहभाग घेतला.

    0000

    शिक्षणसंस्थांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय तपासून कार्यवाही करणार – मंत्री उदय सामंत

    मुंबई दि. 26 : राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीतील शिक्षण संस्थांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय तपासून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

    याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

    श्री. सामंत म्हणाले की, बुलढाणा नगरपालिका व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील काही शिक्षण संस्थांनी मालमत्ता कर माफ करण्याची मागणी केली आहे, असे आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या अहवालात नमूद केले आहे. तत्कालीन नगरविकास मंत्री यांची प्रशासक, औरंगाबाद महानगरपालिका यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झालेली आहे. तथापि, औरंगाबाद महानगरपालिका 2014 पासून महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांना निवासीदराने कराची आकारणी करत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांना अर्ज केल्यानंतर आयकर करमाफी प्रमाणपत्र तसेच गुणवत्तेनुसार मालमत्ता करात सूट देण्यात येत असते. तसेच इतर महानगरपालिका व नगरपरिषदांनी कायद्यात तरतूद आहे, त्याप्रमाणे करात सूट देण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

    या चर्चेत सर्वश्री सदस्य अभिजीत वंजारी, निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.

    0000

    दत्ता कोकरे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed