‘अमृत भारत योजनें’तर्गत विकास
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत स्थानक’ योजना सुरू केली आहे. मध्य रेल्वेवरील १५ स्थानकांचा योजनेंतर्गत विकास करण्यात येणार आहे. यात चिंचपोकळी स्थानकाचा समावेश आहे. प्रवाशांना डेकसह आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
जागेच्या अडचणींवर डेकचा उपाय
चिंचपोकळी स्थानकाच्या पूर्वेला रुळांना लागून असलेल्या भितींलगत रहिवासी इमारती आहेत. पश्चिमेला रेल्वे मार्गिका आणि वसाहती आहेत. परिणामी स्थानकाच्या पूर्व-पश्चिम दिशेला विस्तारासाठी जागेची अडचण आहे. यावर उपाय म्हणून छताच्या जागी फलाटाला समांतर डेक उभारण्याचे नियोजन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.
३०० मीटर असणार लांबी
चिंचपोकळी स्थानकात एक फलाट असून त्याच्या दोन्ही बाजूने अप आणि डाउन धीम्या लोकलची वाहतूक होते. नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेकची लांबी २८०-३०० मीटर असून रुंदी सात ते आठ मीटर असणार आहे. डेकला स्थानकात ये-जा करण्यासाठी सरकते जिने, साध्या जिन्यांची थेट जोडणी देण्यात येणार आहे.
तयार सांगाड्याचा वापर
प्रवासी वाहतूक सुरू असताना काम करणे हे मोठे सगळ्यात मोठे आव्हान आहे. यामुळे प्रत्यक्ष कामाच्या शेवटच्या टप्प्यात काही दिवसांसाठी स्थानकावरील वाहतूक बंद करण्याचीही शक्यता आहे. यावर उपाय म्हणून डेकचा तयार सांगाडा आणून जोडण्यात येईल. सामान्यपणे स्थानकात डेक तयार करताना सुटे भाग त्याच ठिकाणी जोडून उभारणी केली जाते. यामुळे मोठ्या मोकळ्या जागेची आवश्यकता असते.
अमृत भारत योजनेंतर्गत चिंचपोकळी स्थानकात डेक उभारण्यासाठी व्यवहार्यता तपासण्यात येत आहे. हा उपाय यशस्वी ठरल्यास एक फलाट असलेल्या अन्य स्थानकात देखील गर्दी नियोजनासाठी हा पर्याय उपलब्ध होईल.
– रजनीश कुमार गोयल, मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे