म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने २४ डब्यांच्या १८ विनाआरक्षित रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य व कोकणे रेल्वेने २०८ आणि पश्चिम व कोकण रेल्वेने ४० फेऱ्यांची घोषणा केली आहे. यामुळे उत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्यांसाठी एकूण २६६ फेऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. या गाड्यांच्या सविस्तर थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-कुडाळ गणपती विशेष गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे. ही गाडी एलटीटीहून रात्री १२.४५ वाजता सुटणार असून सकाळी ११.३० वाजता कुडाळला पोहोचेल. ०११८६ कुडाळ ते एलटीटी गणपती विशेष गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी कुडाळहून दुपारी १२.१० वाजता सुटणार असून एलटीटी येथे मध्यरात्री १२.३५ वाजता पोहोचेल.