तत्पूर्वी मदनदास देवी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी पुण्यातील मोतीबाग या संघाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. मोतीबागमध्ये अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सह सरकार्यवाह सुरेश सोहनी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हे पुण्यात दाखल झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुंबईहून एकत्रच पुण्यात दाखल होऊन मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे प्रथमच पुण्यात येत आहेत. ते आज मुंबईहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुण्यात दाखल झाले असून पुणे विमानतळ येथून थेट पुण्याचे राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे मुख्यालय असणाऱ्या मोतीबाग येथे येऊन देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांची भाजपसोबत जवळीक वाढली असल्याचे आत्तापर्यंत झालेल्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेची आणि भाजपची युती भावनिक असून राष्ट्रवादीसोबत युती ही राजकीय असल्याचं म्हणत १०-१५ वर्षात ती देखील भावनिक होईल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता आज अजित पवार एनडीएचे घटक झाल्यानंतर प्रथमच थेट संघाच्या पुण्याच्या मुख्यालयात जाणार असल्याने युतीचे हे राजकीय बंध आता भावनिक विचारांशी देखील जोडले जात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.