• Sat. Sep 21st, 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

ByMH LIVE NEWS

Jul 24, 2023
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करताना सांगितले.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांची नुकतीच सहकुटुंब भेट घेतली. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मराठीतून ट्विट करत मुख्यमंत्र्याचे कौतुक केले आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी विधानपरिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहात निवेदन केले.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटून मला आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे’, असे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटबद्दल आम्ही प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानतो. माझे सर्व सहकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळून ओळखत असलेली प्रत्येक व्यक्ती प्रधानमंत्री यांच्या मताशी सहमत होईल. त्यांचा एक जवळचा सहकारी म्हणून मी सतत याचा अनुभव घेत आलो आहे.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, सामान्य माणसावर संकट आले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यातला कार्यकर्ता जागा होतो. याचा अनुभव गेल्याच आठवड्यात इरशाळवाडी दुर्घटनेच्या वेळी घेतला. चिखला पावसाची पर्वा न करता दीड तास डोंगर चढून जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने यापूर्वी पाहिला नसेल. डोंगर चढून जात त्यांनी स्वतःच त्या दिवशी मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. यंत्रणांना दिशा आणि वेग दिला. त्याचवेळी विविध यंत्रणांशी संपर्कही करत होते. सामान्य माणसांविषयीची तळमळ त्या दिवशी महाराष्ट्राने पाहिली. एवढेच नाही या दुर्घटनेमुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्वही त्यांनी स्वीकारले. कणखर बाप आणि जीवापाड प्रेम करणारी आई अशी दोन्ही रूपे त्या दिवशी आपण पाहिली. अवकाळी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, पीक विम्याचे पाठबळ असावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजनांसाठी पुढाकार घेतला. शेतकरी सन्मानाचा ध्यास घेतला आहे. ज्येष्ठांना आधार, महिलांना पाठबळ देण्याच्या विचाराने त्यांच्या नेतृत्वात सरकार काम करत आहे. सर्व घटकातील नागरिकांना आपलेसे वाटणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्कृष्ट मंत्री, उत्कृष्ट लोकप्रतिनिधी असे पुरस्कार मिळाले आहेत. गरिबांसाठीची ही कणव त्यांच्या कृतीतून दिसते.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, कोरोनाकाळात धोक्याची पर्वा न करता कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते रस्त्यावर उतरले होते. लोकांना लागेल ती मदत पुरवण्यासाठी ते जातीने लक्ष देत होते. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट. बहाल केली आहे. परंतु, अशा पुरस्कारांनी त्यांना अधिक जोमाने जनसेवा करण्याची प्रेरणाच मिळाली आहे, असेही मंत्री श्री.देसाई म्हणाले.
**
संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed