• Thu. Nov 14th, 2024

    टंकलेखन परीक्षेत मोठा झोल उघडकीस; टाइपरायटिंग प्रतिनिधींसह १६ जणांवर गुन्हे दाखल, काय घडलं?

    टंकलेखन परीक्षेत मोठा झोल उघडकीस; टाइपरायटिंग प्रतिनिधींसह १६ जणांवर गुन्हे दाखल, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : टंकलेखन परीक्षेसाठी असलेल्या एका परीक्षा सेंटरवर टंक लेखन संस्थेच्या प्रतिनिधींकडून तोतयागिरी केल्याची घटना समोर आली आहे. या परीक्षा केंद्रावर असलेल्या टाईपरायटिंग संस्थेच्या प्रतिनिधींनी उत्तरपत्रिकेची काही पाने घेऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी टाईपरायटिंग संस्थेच्या प्रतिनिधींसह १६ जणांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण?

    या प्रकरणात जालम विठ्ठलराव चौरे (वय ४७, रा. योगीराज हौसिंग सोसायटी, परिजात नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जालम चौरे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करतात. ते वेणुताई चव्हाण हायस्कूल येथे केंद्र संचालक म्हणुन नियुक्त होते. २१ जुलै रोजी त्यांच्या पथकासह या केंद्राला सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्यान भेट दिली. या वेळी केंद्रातील परीक्षा हॉल क्रमांक १ आणि २ येथे विद्यार्थी परिक्षा देत होते. परीक्षा परिषदेचे अध्यक्षांच्या भेटीच्या वेळी त्यांना ओळखपत्र न दाखवता चार जण परीक्षा केंद्राबाहेर निघून गेले. त्या वेळी तपासणी पथकाला संशय आला. त्यांनी तपासणी केली असताना सातारा परिसरातील भवानी टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट अभिजीत कोरे उत्तर पत्रिकेची एक ते तीन पाने घेऊन पळ काढला, तर विष्णू गोळेने उत्तर पत्रिकेचे चौथे पान घेऊन पळ काढला. या प्रकरणात अभिजीत कोरे, विष्णू गोले, एन ११ येथील मंजुषा टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटचे शुभम जारवाल, तसेच बिडकीन येथील सुयोग टायपिंग इन्स्टिट्यूटचे अमोल गोठवाल या चार इन्स्टिट्यूट प्रतिनिधीसह १६ विद्यार्थ्यांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रतिनिधींनी संबंधित विद्यार्थ्यांचे पेपर टंकलेखन केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार मनोज किसनराव बेहाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

    अशी आहे विद्यार्थ्यांची नावे

    परीक्षा केंद्र संचालक चौरे यांच्या तक्रारीवरून इन्स्टिट्युट प्रतिनिधींसह विशाल राठोड, प्रज्ञा वानखडे, किरण उगले, प्रीतम बमनावत, ज्ञानेश्वर बाधे, दिपाली थाटे, रवींद्र अहिरे, ज्योती दाभकर, काजल डेढे, मनोहर लोखंडे, आकाश गिरी, दिपक गोलवाल, विद्या भगत, किशोर गोलवाल, प्रीती जाधव, चरण कोळी या विद्यार्थ्यांचेही नाव तक्रारीत नोंदविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनाही तक्रारीत आरोपी म्हणून देण्यात आले आहे.
    महाराष्ट्राला हादरवणारी घटना! झुडपांत आढळले प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले जिवंत अर्भक
    इन्स्टिट्यूट प्रतिनिधी कशासाठी?

    राष्ट्रीय वाणिज्य परीक्षा टंकलेखनमध्ये परीक्षा केंद्रावर टंकलेखन करीत असताना, एखाद्या विद्यार्थ्याची टंकलेखनाची मशीन खराब झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण आल्यास टंकलेखन मशीन बदलून देता यावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर असे प्रतिनिधी व मशीन ठेवण्यात येत असतात. मात्र या केंद्रावर या प्रतिनिधींकडून तोतयागिरी करून आपले विद्यार्थी पास व्हावे, यासाठी फेरफार केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed