वारेगाव जवळील राखेचा बंधारा फुटल्याची घटना बुधवारी दुपारी घडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. रेतीचे पोते टाकून फुटलेल्या बंधाऱ्याचा प्रवाह रोखण्यात आला. तलावातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी ‘सायफन’ पद्धतीचा वापर करण्यात येत आहे, असे महाजनकोकडून सांगण्यात आले.
वीज प्रकल्पातील राख शेतजमिनीत शिरणे अतिशय धोकादायक आहे. रेडिअॅटिव्ह केमिकल्स यात जातात. त्यामुळे कधीच शेती करता येणार नाही, अशी स्थिती जमिनीची होते. या जमिनीचा शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज आहे. जमिनीसह पाण्यातही ही राख गेली असल्याने अधिक धोके आहेत, असे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पवार यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या गावात प्रदूषणाचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
वारेगावही त्याच वाटेवर
खसाळा-म्हसाळा या गावात १९९०पूर्वी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांमुळे श्रीमंती होती. टमाटर, वांगी, भेंडी, ज्वारी, जवस, सोयाबीन, गहू अशी पिके येथे घेतली जात असत. विकासाचे स्वप्न दाखवून खसाळा गावातील शेती वीजप्रकल्पासाठी घेण्यात आली. या गावातील नागरिकांचे पुनर्वसन म्हसाळा या गावात करण्यात आले. २०१०मध्ये ३३० मेगावॉटचा प्रकल्प तयार झाल्याने राखेचे क्षेत्र विस्तारण्यात आले. वीज प्रकल्प झाल्यानंतरही म्हसाळा गावात शेती केली जात होती. मात्र, राखेमुळे शेतजमीन नापिक झाली. अखेर गावकऱ्यांना आपली जमीन विटभट्टीसाठी विकावी लागली. वारेगावही आता त्याच वाटेवर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.