• Mon. Nov 25th, 2024

    साताऱ्यातील उलटा धबधबा पाहण्यासाठी गेले, हुल्लडबाज तरुणांचा राडा, पती-पत्नीला मारहाण

    साताऱ्यातील उलटा धबधबा पाहण्यासाठी गेले, हुल्लडबाज तरुणांचा राडा, पती-पत्नीला मारहाण

    सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात सध्या जोरदार पाऊस असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत सडा वाघापूर पठारावर उलटा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र, पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांमुळे इतर पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज धबधब्याजवळ पती-पत्नी सेल्फी घेत असताना ५ ते ६ युवक पत्नीकडे पाहून आरडा-ओरडा करू लागले. त्यामुळे पतीने त्यांच्याकडे जावून संबंधित युवकांना जाब विचारला असता चिडून जावून त्या युवकांनी पतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला आहे. कास परिसरातील एकीव धबधब्यावरील घटना ताजी असतानाच पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी दुचाकीने पाटण तालुक्यातील चाफळ विभागात असलेल्या सडावाघापूर पठारावर उलटा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. पवनचक्कीजवळ उभे राहून ते दोघे जण सेल्फी घेत असताना ५ ते ६ युवक पत्नीकडे पाहून आरडा-ओरडा करू लागले. त्यामुळे पतीने त्याठिकाणी जावून संबंधित युवकांना जाब विचारला.
    मात्र त्यावरुन चिडून जावून त्या युवकांनी पतीला बेदम मारहाण केली. तसेच पतीला मारहाण करु नका, असे म्हणून भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली. या मारहाणीत पती जखमी झाला आहे. याबाबत मल्हारपेठ पोलीस अधिक तपास हवालदार आनंद आव्हाड करत आहेत.

    दरम्यान, या प्रकाराबाबतची तक्रार मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तो गुन्हा पाटण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयिताची नावे देण्याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.

    मागील रविवारी जावली तालुक्यातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून दोन तरुणांना ७०० ते ८०० फूट खोल दरीत ढकलणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ मज्जिद शेख (वय २२), निखील राजेंद्र कोळेकर (वय २३), साहिल मेहबूब शेख (वय १८) सर्व रा. भिमाबाई आंबेडकरनगर सदर बझार, सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत दोघा युवकांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed