परभणी : ‘जालना- परभणी- नांदेड महामार्गा’साठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीसाठी, गुणांक दोन वापरून पाचपट मोबदला द्यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यांतील शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारपासून (२६ जुलै) जोरदार धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जालना- परभणी- नांदेड महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. संघर्ष समितीचे रामेश्वर गाडेकर (रायपूर, ता. सेलू) यांनी ही माहिती दिली.
जालना- परभणी- नांदेड महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. संघर्ष समितीचे रामेश्वर गाडेकर (रायपूर, ता. सेलू) यांनी ही माहिती दिली.
संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची पाण्याचे स्रोत, सातबारा उतारा नोंद, स्थळ पाहणी यांद्वारे बागायती, हंगामी बागायती, कोरडवाहू याप्रमाणे वर्गवारी करावी, फळबागांचे योग्य मूल्यांकन करण्यात यावे, संयुक्त मोजणी करून तयार केलेले परिशिष्ट १६ गृहित धरून मूल्यांकन करण्यात यावे, संपूर्ण भूसंपादनाची प्रक्रिया २०१३च्या कायद्याप्रमाणे राबवावी आदींसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे परभणी जिल्ह्यातील रामेश्वर गाडेकर, कॉम्रेड राजन क्षीरसागर, संदेश देसाई, गोविंद घाटोळ, विठ्ठल धस, शिवाजी चोपडे, अशोक रन्हेर, विजय खरात, प्रशांत नाईक, रमेश माने, कैलास जवंजाळ, खाजाभाई काजी, मंठा येथील कालिदास निर्वळ, नांदेडचे हरिश हंबर्डे, दासराव हंबर्डे, परतूरचे परमेश्वर उबाळे आदी आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.