• Sat. Sep 21st, 2024

मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

ByMH LIVE NEWS

Jul 20, 2023
मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. 20 : राज्यात आजपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

आजपासून ते २० ऑगस्ट २०२३ या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील, तसंच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसंच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार असल्याचं श्री. देशपांडे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे, तसंच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची निश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी आहे असं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळेच जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे, ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत, लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावं बदलून घ्यावीत, स्थलांतरीत  झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केलं आहे.

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याने, सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केलं आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed