• Sun. Sep 22nd, 2024

अशक्य काहीच नाही! IVF तंत्रज्ञानानं संकरित गाईच्या पोटी कालवडीचा जन्म, पुण्यातील कॉलेजचं संशोधन

अशक्य काहीच नाही! IVF तंत्रज्ञानानं संकरित गाईच्या पोटी कालवडीचा जन्म, पुण्यातील कॉलेजचं संशोधन

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या (भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान) माध्यमातून संकरित गाईच्या पोटी राजस्थानातील थारपारकर जातीची कालवड जन्माला घालण्यात संशोधकांना यश आले.

‘हा भ्रूण प्रयोगशाळेत तयर करून सात दिवसांनंतर देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रातील संकरित गायीमध्ये प्रत्यारोपण करण्यात आला. या संकरातून जन्मलेल्या वासराचे वजन २१ किलो आहे,’ अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने आणि तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी दिली.

‘राज्य सरकारने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत उत्कृष्ट आनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगली आनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन केले जाते. त्यातून तयार झालेल्या फलित अंडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या गायीमध्ये प्रत्यारोपित करून त्याची वाढ केली जाते. त्यातून वासरू जन्माला येते. या प्रकल्पांतर्गत सुमारे दीडशेहून अधिक साहिवाल, गीर, थारपारकर, लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. त्यामुळे देशी गोवंशाची संख्या वाढण्यास मोठी मदत होणार आहे,’ अशी माहिती डॉ. माने यांनी दिली. थारपारकर ही उत्तर राजस्थानातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गाईची जात आहे.
शेतकऱ्यांसाठी बंपर लॉटरी! ‘या’ योजनेतून शेतीसाठी दिवसाही मिळणार वीज, कोणती योजना? कसे व्हाल सहभागी?
देशी गाईंच्या संवर्धनासाठी उपयुक्त

‘देशी गायींचे संवर्धन करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून गावठी अथवा संकरित गायींच्या माध्यमातून देशी गाईंच्या कालवडी तयार केल्या जातात. बदलत्या हवामानामध्ये तग धरणाऱ्या आणि रोगप्रतिकारक क्षमता जास्त असणाऱ्या देशी गायींची संख्या वाढल्यास दुधाच्या उत्पादनात आणि नैसर्गिक शेतीला मदत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २० गीर आणि साहिवाल जातीच्या कालवडी विद्यापीठ डेअरी आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार झाल्या आहेत. त्यामध्ये प्रथमच थारपारकर कालवडीचा जन्म झाला आहे,’ अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed