रायगड, (अलिबाग) दि. २०: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला आहे.
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.
बचाव कार्यास प्राधान्य देताना युद्धपातळीवर मदत कार्य करण्यात येईल, आदिवासी पाड्यावरील दरड कोसळलेली घटना वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इरशाळगड ठाकूरवाडी याठिकाणी रात्रीपासून प्रशासनाच्या वतीने मदतकार्य व मदतीचा ओघ चालू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रात्रीच दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदत साहित्य व पथके पाठवून मदत कार्यास सुरुवात करण्यात आली. दुर्घटनाग्रस्त स्थळी विविध शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, घटनास्थळी पोहचून मदत कार्य करत आहेत.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून शासकीय यंत्रणा विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बचाव व मदत कार्यास गती
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सतत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत वेळोवेळी सूचना देऊन मदत कार्यात गती देत आहेत. यावेळी शासकीय यंत्रणांबरोबरच दुर्घटनास्थळाच्या जवळच्या संस्था, यंत्रणा व साहित्य त्यांनी मदत करण्यात सहभागी करून घेतले. ज्यामुळे रात्री शासकीय यंत्रणेसह अनेक स्वयंसेवी संस्था घटनास्थळी पोहोचून बचाव व मदत कार्य सुरू झाले .
घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे यांची भेट
भूस्ख्खलन झालेल्या इरशाळगड ठाकूरवाडी येथे मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या अनुषंगाने मदत कार्याची माहिती घेऊन प्रशासन व पोलीस मदत कार्यात व्यस्त यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने सूचना दिल्या आहेत.
दुर्घटनेनंतर अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा , बदलापूर , पनवेल ,वाशी व मुंबई येथून मदत पथके रवाना झाली. ८ ॲम्बुलन्स, ४४ अधिकारी कर्मचारी, २ जेसीबी पनवेल महापालिका येथून पाठविण्यात आली आहेत. कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स हे देखील या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
उपचारांसाठी शासकीय रुग्णालय तसेच एमजीएम हॉस्पिटल येथे बेड तयार ठेवण्यात आले असून घटनास्थळावर पाणी बॉटल्स ,ब्लॅंकेट्स ,टॉर्च ,मदत साहित्य, चादरी, बिस्कीटे तसेच इतर प्राथमिक उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्हा आरोग्य अधिकारी व विविध यंत्रणातील अधिकारी मदत करत सहभागी झाले आहेत.
खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरशाळवाडी येथे घडलेल्या दरड दुर्घटनेच्या अनुषंगाने चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.
दुर्गम भागातील इरशाळवाडीत दुर्घटनेच्या पूर्वी साधारणत: २५ घरे व १५० लोकवस्ती होती. त्यापैकी पाच जण दगावले असून अनेक व्यक्ती ढिगाऱ्याखाली दबल्याची संभावना आहे. वाडीतील काही मुले जागी होती. त्यांनी आपला जीव वाचवत सदर घटना कळवली होती.
०००