परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात नाममात्र दरामध्ये टू डी इको, एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन या चाचण्या उपलब्ध असताना रुग्णांना खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार टाटा रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आला. सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत रुग्णालय प्रशासनाने पाळत ठेवून लॅबसोबत कर्मचाऱ्यांचे साटेलोटे उघडकीस आणले. हे रुग्णालय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून प्रशासनाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी इन्फिनिटी लॅबचे व्यवस्थापक आणि मालक यांच्यासह टाटा रुग्णालयाच्या २१ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर लगेचच ११ जणांची धरपकड करण्यात आली असून हे सर्व सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असून डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रुग्णालयात व्यवस्था उपलब्ध असताना खासगी लॅबमधून आणलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालाबाबत डॉक्टरांनी कशी विचारणा केली नाही? असा प्रश्न पोलिसांना पडला असून काही डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे टाटा रुग्णालयाच्या आजूबाजूला असलेल्या लॅब चालकांचीही चौकशी केली जाणार आहे. इन्फिनिटी लॅबमध्ये टाटामधून तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नोंदी घेण्यात येत असून त्यांच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न असून यातून काही नवीन माहिती पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पाच हजारांसाठी १० टक्के कमिशन
लॅबमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी एखाद्या रुग्णाला पाठविल्यास त्याचे बिल पाच हजार रुपयांपर्यंत झाल्यास कर्मचाऱ्यांना १० टक्के कमिशन दिले जात होते. पाच हजारपेक्षा अधिक बिल झाल्यास २० टक्के कमिशन देण्याचे ठरले होते. त्यानंतरच्या पाच हजार रुपयांच्या टप्प्यानुसार रुग्णांना पाठविण्यापूर्वी फोनवरून कमिशनबाबत ठरविले जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
रुग्ण पोहोचण्यापूर्वी फोन
डॉक्टरने टाटा रुग्णालयाच्या केस पेपरवर वैद्यकीय चाचण्यांबाबत लिहून दिल्यानंतर कर्मचारी हा केसपेपर आपल्या ताब्यात घ्यायचे. एका साध्या कागदावर या चाचण्या लिहून त्या रुग्णाला इन्फिनिटी लॅबमध्ये पाठविण्यात यायचे. रुग्ण पाठवताना त्याला आपण पाठविले आहे हे कळावे यासाठी कर्मचारी लॅबमधील कर्मचाऱ्यांना फोन करून सांगत. त्यानुसार संबंधित रुग्णाच्या नावाची नोंद पाठविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावावर केली जायची.