१९८० ते १९९५ पर्यंत प्रसाद तनपुरे काँग्रेसचे आमदार होते. १९९९ ला शरद पवारांना साथ देत त्यांनी राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळवली. पण २००४ चंद्रशेखर कदमांकडून तनपुरेंचा पराभव झाला. २००९ च्या निवडणुकीतही शिवाजीराव कर्डिलेंकडून प्रसाद तनपुरेंना आव्हान देण्यात आले. या लढाईत तनपुरेंचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर २०१४ ला उषा तनपुरे मैदानात उतरल्या, पण शिवाजीराव कर्डिले यांनी पुन्हा विजय खेचून आणला. सलग तीन निवडणुकांत पराभव झाल्याने तनपुरेंच्या वर्चस्वाला धक्का लागला. पण प्राजक्त तनपुरेंनी गुलाल उधळून आई-वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला.
आई-वडिलांचा वारसा घेऊन प्राजक्त तनपुरे राजकारणात आले. २००५ ला प्रसाद साखर कारखान्याचे संचालकपदी त्यांची निवड झाली. यानंतर २०१६ ला राहुरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते विजयी झाले. २०१९ ला राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पाच टर्म आमदार राहिलेल्या शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला. मविआ सरकार येताच प्राजक्त तनपुरे यांना राज्य मंत्री पदाची संधी मिळाली. त्यांनी सहा खात्याचा कारभार सांभाळला. अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर तनपुरे यांनी शरद पवारांशी निष्ठा कायम ठेवली.
संग्राम जगताप, निलेश लंके आणि आशुतोष काळे… राष्ट्रवादीतील फुटीवेळी नगरमधल्या चार पैकी तीन आमदारांनी अजितदादांना साथ दिली. पण प्राजक्त तनपुरे एकटेच पवारांशी निष्ठावंत राहिले. एकीकडे जयंत पाटील शरद पवारांमागे बुरूजासारखे उभे असतानाच जयंतरावांच्या भाच्यानेही निष्ठा दाखवून दिली. जयंत पाटील राष्ट्रवादीकडून खिंड लढवत असल्याने अजितदादा गटाकडून तनपुरेंना खिंडीत पकडलं जाऊ शकतं. मात्र, अजित पवारांविरोधात राजकारण करायचं झाल्यास प्राजक्त तनपुरे एकट्यालाच खिंड लढवावी लागेल. प्राजक्त तनपुरेही मामा जयंत पाटलांप्रमाणे अजितदादांना अंगावर घेतील का?, हे आगामी काळात पाहावे लागेल.