राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (सोमवार) प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी आदल्या दिवशीच दादा गटाच्या सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे जाऊन भेट घेतली. सगळ्या मंत्र्यांनी पुन्हा शरद पवार यांना भाजपला पाठिंबा देण्याविषयी गळ घातली. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ आदी नेत्यांनी पवारांचं मन वळविण्याचं प्रयत्न केला.
आम्ही म्हटलं साहेब, तुम्हीही आमच्यासोबत चला, त्यावर शरद पवार म्हणाले…
जवळपास चाळीस मिनिटे चाललेल्या चर्चेचा तपशील प्रफुल पटेल यांनी माध्यमांना सांगितला. ते म्हणाले, आमचं दैवत, आमचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि बाकी सगळे मंत्रिमहोदय वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता आलो होतो. पवारसाहेब एका मिटिंगच्या निमित्ताने वाय बी चव्हाण सेंटर येथे आल्याचं कळलं. मग आम्ही संधी साधून त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्याचसोबत आम्ही त्यांना विनंती केली, त्यांच्यासाठी आमच्या मनात आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहू शकतो, याचा विचार करावा, तसेच येणाऱ्या काळातील राजकारणाविषयी मार्गदर्शन करावं, त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. पण आमच्या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. तसेच उद्यापासून राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होतंय. अजितदादांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमहोदय त्यांचं त्यांचं काम जोमाने सुरु करील, असंही प्रफुल पटेल म्हणाले.
दादा गटाचा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला
एकंदरित शरद पवार यांनी कोणतंच उत्तर न देऊन दादा गटाचा प्रस्ताव रिजेक्ट केल्याचंच बोललं जातंय. जवळपास अर्ध्या तासांहून अधिक वेळ सुरु असलेली बैठक संपविण्याचा इशारा पवारांनी केला. दिलेल्या प्रस्तावावर पवार काहीच उत्तर देत नाहीत, हे पाहून दादा गटाच्या मंत्र्यांनीही बैठक आवरती घेतली. भाजपबरोबर जायचं नाही, हे आधीही शरद पवार यांनी दादांच्या समर्थक आमदारांना सांगितलं होतं. आजही कोणतंच उत्तर न देऊन दादांच्या मंत्र्यांच्या प्रस्तावाचा पवारांनी इन्कार केल्याचीच चर्चा आहे.