मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील भुईंजमधील विनायक खरे याने नुकत्याच झालेल्या सीएच्या परीक्षेत यश मिळवले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या देशपातळीवरील या परीक्षेत संपूर्ण भारतातील तब्बल एक लाख १८ हजार ९११ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २६ हजार २३३ विद्यार्थी पास झाले असून ही परीक्षा अतिशय खडतर समजली जाते. विनायकची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची. विनायक लहान असतानाच त्याच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. आपल्या विनायकने सीए व्हावे हे स्वप्न विनायकच्या आई- वडिलांनी पाहिले होते.
परंतु विनायकचे वडील जीवन खरे यांचे निधन झाल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये कोणताही आधार नव्हता. पण विनायकच्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने आई कमल खरे यांनी भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शालेय पोषण आहारात फक ५०० रुपयांच्या मानधनावर काम केले. पर्यायाने मोलमजुरी करून आपल्या विनायक आणि मधुकर या दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यास सुरुवात केली. या कठीण प्रसंगी भुईंज येथील भारतीय परराष्ट्र खात्यामध्ये असलेले राजेश स्वामी यांचे बंधू प्राध्यापक मिलिंद स्वामी आणि भुईंजमधील सामाजिक कार्यकर्ते, सिनेअभिनेते मधुकर खरे यांनी विनायक आणि मधुकरला सर्वतोपरी मदत केली.
आपल्या आई-वडिलांनी, चुलत्याने पाहिलेल्या स्वप्नांची परिपूर्ती करण्याच्या ध्येयाने विनायकने रात्रंदिवस अभ्यास सुरू केला. परंतु पहिल्या प्रयत्नात विनायकला मात्र सीएच्या परीक्षेत एका मार्क्सने हुलकावणी दिली. पण खचून न जाता विनायकने स्वतःला एका छोट्या पत्र्याच्या खोलीमध्ये कोंडून घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. फक्त ४ तास झोपून, रोज तब्बल १८ तास अभ्यास करीत विनायकने स्वतःला अभ्यासात झोकून दिले. पहाटेचा व्यायाम करून फक्त जेवणासाठी थोडा वेळ देणारा विनायक काहीही झालं तरी सीएची परीक्षा पास होणारच, या जिद्दीने पेटलेला होता. त्याच विनायकने जिद्द, चिकाटीच्या जोरावर सीएच्या परीक्षेत यश मिळवले.
विनायकसोबत त्याचा धाकटा भाऊ मधुकरने सुद्धा इंजिनियरची परीक्षा उत्तीर्ण होऊन आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. विनायकच्या या यशाने संपूर्ण वाई तालुक्यातून त्याच्यावर आणि त्याची आई कमल खरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विनायकने आपले यशाचे सारे श्रेय आईला दिले आहे. आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केल्याचे त्याला मनस्वी आनंद होत आहे.