राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पेटाळा मैदान येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा आवडता जिल्हा होता असे म्हटले. कोणत्याही प्रचाराचा आणि दौऱ्याचा शुभारंभ बाळासाहेब ठाकरे हे आई अंबाबाईचे दर्शन घेऊन करत होते असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, पक्ष संघटनेसाठी त्यांनी शिवसैनिकांचे मार्गदर्शनही केले. यानंतर सभा आटोपून रात्री त्यांनी थेट श्री. करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर गाठले. दरम्यान रात्री त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी त्यांना शाल व श्रीफळ दिले.
यानंतर एकनाथ शिंदे हे मंदिरा बाहेर येऊन पुढे जात असतानाच एका ७५ वर्षीय वृद्ध आजोबांनी त्यांना हाक मारली आणि त्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जवळ जात आजोबांशी संवाद साधला. मला कोल्हापूर शहराबद्दल बोलायचं आहे आणि तेही मुंबईमध्ये येऊन असे म्हणत मुख्यमंत्र्यांना मुंबईमध्ये भेटण्याची इच्छा देखील या आजोबांनी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी आपण जरूर भेटायला या असे सांगितले.
यानंतर आजोबांनी आपल्या सरकारने ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीमधील प्रवास मोफत केला याबद्दल आभार मानले. तसेच या निर्णयामुळे मी सध्या सगळीकडे फुकट फिरत आहे असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. हे ऐकून मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण कौतुकाने हसू लागले. दरम्यान, हा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत असून आजोबांचा हजरजबाबीपणा पाहून कौतुक केले जात आहे.