• Sat. Sep 21st, 2024

खातेवाटपात अर्थ खातं पुन्हा अजित पवारांकडे; बच्चू कडू थेट बोलले, ‘राष्ट्रवादीला झुकतं माप…’

खातेवाटपात अर्थ खातं पुन्हा अजित पवारांकडे; बच्चू कडू थेट बोलले, ‘राष्ट्रवादीला झुकतं माप…’

कोल्हापूर : राज्यातील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाल्याने नाराज असलेले शिंदे गटाचे आमदार आता खातेवाटपावर नाराज असल्याचे चित्र आहे. खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं गेल्याचं दिसत आहे. अर्थ खातं जरी अजितदादांना दिलं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे, असं अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं; सतेज पाटलांना खासगीत दिली मोठी ऑफर, चर्चांना उधाण
राज्यात भाजप शिंदे सरकारला एक वर्ष झालं आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी अनेक आमदार हे देव पाण्यात ठेवून बसले होते. तर काही आमदारांनी आपण मंत्री होणार म्हणून नवीन कपडे देखील तयार करून घेतले होते. मात्र राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर भाजप, शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आला आणि भाजप शिंदे गटाच्या अनेक आमदारांना धक्का बसला.
महाराष्ट्रात ‘कोल्हापुरी’ महाडिक पॅटर्न, निवडून येईल त्याच्या हातात कमळ, भाजपचा फॉर्म्युला
गेली वर्षभर मंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेताना पहावं लागलं. यामुळे शिंदे गटाचे आमदार नाराज झाले. अनेकांनी आपली नाराजी उघडपणे दर्शवली. दरम्यान, एक आठवडा झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. तर अजित पवार हे अर्थ खातं आपल्याला हवं, यावर ठाम असल्याची चर्चा होती. तर अजित पवारांना अर्थ खात देऊ नये यासाठी शिंदे गटाचे आमदार आग्रही होते. मात्र हा मुद्दा अखेर दिल्ली दरबारी पोहोचला आणि निकाली निघाला.

माझी विचारधारा शाहू ,फुले ,आंबेडकरांची; घरी बसेन पण भाजपात प्रवेश नाही; आमदार राजेश पाटलांनी ठणकावून सांगितलं

अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलं. या सोबतच सहकार, कृषी यासारखे तगडे खाते हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आले आहेत. यामुळे खाते वाटपावरूनही शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप दिल्याचं दिसून येत आहे, असं अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले. तसेच मागचा काळ पाहिला तर अजितदादांना अर्थ खातं देण्यास आमचा सर्वांचाच विरोध होता. मात्र आता अर्थ खातं जरी अजितदादांना दिलं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. एकनाथ शिंदे मागे जे झालं ते आता होऊ देणार नाहीत, असं बच्चू कडू पुढे म्हणाले.

या मंत्रिमंडळ विस्तारात मी मंत्री पद मागत होतो. मात्र मला मंत्रालय मिळालं. यामुळे मी नाराज नाही. उलट दिव्यांग बांधवांसाठी कोणताही निधी मी कमी पडू देणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ. येत्या १७ तारखेला माझी मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे. यानंतर १८ तारखेला मी माझा निर्णय जाहीर करेल, असं अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. यामुळे १८ तारखेला बच्चू कडू काय निर्णय घेणार हे याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed