लग्नानंतर त्या दोघांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि ओसंडून वाहणाऱ्या या आनंदाची सर जगातल्या कोणत्याही आनंदापेक्षा अधिक आहे, असंच त्यांच्या पालकांना वाटत असेल. जन्मतःच डाऊन सिंड्रोम म्हणजे गतीमंद असलेले हे दोघेही आता पती-पत्नी झाले आहेत. गतीमंद असतानाही एकेमकांशी लग्न करणारं हे भारतातील पहिलं जोडपं ठरले आहे. अर्थातच दोघांचाही इथवरचा प्रवास सोपा नव्हता. पण, अनन्या आणि विघ्नेशच्या आई वडिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे घडू शकलं.
सत्तावीस वर्षीय विघ्नेश गतीमंद असला तरीही मागील पाच वर्षांपासून स्वत:च्या पायावर उभा आहे आणि एका मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपनीत काम करतो. तर २२ वर्षीय अनन्या देखील एक शिक्षिका आहे. ती गतीमंद मुलांना शिकवते. आता हे दोघेही विवाह बंधनात आडकल्याने या दोघांचं पुढील वैवाहिक आयुष्य कसं असेल हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, वैद्यकीय सल्ला घेऊन दोघांनाही अतिशय नाजूक बाबींबद्दल सजग करून वैवाहिक आयुष्याच्या अर्थ समजावून सांगितल्या नंतरच दोघांचं लग्न लाऊन देण्यात आलं. अशी अतिशय महत्वाची आणि खासगी माहिती देखील अनन्याच्या आईने दिली. या दोघांच्या लग्नसोहळयात उपस्थित असलेले तरुणही हे सारं पाहून भारावून गेले होते.
खरतर डाऊन सिंड्रोम सारखा आजार असल्याने अनेक कुटुंबीय आपल्या मुलांची लग्न लाऊन देत नाहीत. मात्र, इथे नेमकं उलट चित्र बघायला मिळालं. केवळ गतीमंद असल्यामुळे विघ्नेश आणि अनन्या विवाहबद्ध झाले.