• Wed. Sep 16th, 2026

बांगलादेशने पाकिस्तानला तिसऱ्या सामन्यात 11 धावांनी केलं पराभूत

ByMH LIVE NEWS

Mar 16, 2026
बांगलादेशने पाकिस्तानला तिसऱ्या सामन्यात 11 धावांनी केलं पराभूत

बांगलादेश क्रिकेट टीमने पाकिस्तान विरुद्ध रविवारी 15 मार्च रोजी तिसर्‍या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. बांगलादेशने पाकिस्तानसमोर 291 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलमान आघा याने शतक झळकावून पाकिस्तानला विजयी धावांजवळ आणून ठेवलं होतं. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र सलमान आघा आउट झाल्यानंतर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजांला पाकिस्तानला सुरक्षितपणे विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. पाकिस्तानच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे पाकिस्तानला विजयी धावांचा पाठलाग करताना ऑलआऊट 279 धावा करत आल्या. बांगलादेशने अशाप्रकारे सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली.

तांझिद हसन तमिम आणि तास्किन अहमद या दोघांनी बांगलादेशच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. तर इतरांनीही आपली भूमिका चोखपणे पार पाडली. तांझिदने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं. तांझिदच्या शतकामुळे बांगलादेशला 290 धावांपर्यंत पोहचता आलं. तर त्यानंतर तास्किनने सर्वाधिक 4 विकेट्स घेत पाकिस्तानला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं.

सामन्यात काय झालं?

उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे ढाक्यातील शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 290 धावा केल्या. बांगलादेशसाठी तांझिंद याने सर्वाधिक धावा केल्या. तांझिदने 107 धावांची खेळी केली. तसेच लिटन दास याने 41 आणि तॉहिद हृदॉय याने 48 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानसाठी हारिस रौफ याने 3 विकेट्स मिळवल्या.

पाकिस्तानची बॅटिंग

बांगलादेशने विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला झटपट 3 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेला माज सदाकत आणि साहिबजादा फरहान ही सलामी जोडी ढेर झाली. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती 3 आऊट 17 अशी झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी छोटेखानी भागीदारी करुन सामन्यातील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानची स्थिती 5 आऊट 82 अशी झाली.

सलमान आघाची शतकी खेळी

त्यानंतर सलमान आघा याने शतक झळकावून पाकिस्तानचा डाव सावरला. इतकंच नाही तर सलमानने पाकिस्तानला जवळपास विजयाजवळ आणून ठेवलं. मात्र आघा 48 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. आघा आऊट झाला तेव्हा पाकिस्तानला 30 धावांची गरज होती. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानला विजयी आव्हानापर्यंत पोहचता आलं नाही.  अशाप्रकारे बांगलादेशने सामना जिंकला. तर शतकवीर तंझिद मॅन ऑफ द मॅटचच ठरला.  तसेच तंझिम आणि नाहिद राणा हे दोघे ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed