• Mon. Mar 16th, 2026
    डम्परची दुचाकीला धडक, पुण्यात आजोबा-नातीचा एकाचवेळी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    Pune Dumper Bike Accident : शिवाजी शिळीमकर नात तन्वीसह आंबेगावमधून दुचाकीवरून गावी तांभाडला जात असताना देऊळवाडीजवळ पाठीमागून आलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, पुणे : पाठीमागून आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आजोबांसह नऊ वर्षीय नातीचा मृत्यू झाला. हा अपघात ही घटना पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील हातवे-तांभाड रस्त्यावर देऊळवाडीजवळ शनिवारी घडला. एकाच वेळी आजोबा आणि नात यांना दुर्दैवी अपघातात प्राण गमवावे लागल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    आरोपी डम्पर चालक ताब्यात

    शिवाजी नामदेव शिळीमकर (वय ६९) व तन्वी नितीन शिळीमकर (वय ९, दोघे रा. आरोह गार्डनजवळ, आंबेगाव रोड, पुणे, मूळ रा. तांभाड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात आकाश शिवाजी भुसने (रा. उबाळेनगर, वाघोली, ता. हवेली) या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

    नेमकं काय घडलं?

    पोलिसांनी सांगितले, की शिवाजी शिळीमकर नात तन्वीसह आंबेगावमधून दुचाकीवरून गावी तांभाडला जात होते. देऊळवाडीजवळ पाठीमागून आलेल्या डंपरने (एमएच १४/ एचयू ३७७७) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये शिवाजी व तन्वी गंभीर जखमी झाले.

    स्थानिकांनी तातडीने दोघांना नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड तपास करीत आहेत.

    नेपाळमध्ये अपघात, सात भारतीय ठार

    दुसरीकडे, नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरुंना घेऊन जाणारी एक प्रवासी बस रस्त्यावरून घसरून कोसळली. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. नेपाळच्या गंडकी भागात शनिवारी हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.

    गोरखा जिल्ह्यातील मनकामना मंदिरातून भाविकांना घेऊन परतणारी ही बस कोसळली. हे सर्व प्रवासी मनकामना येथे पूजेसाठी आले होते. मृतांची ओळख पटली असून, मुथू कुमार (५८), अनामलिक (५८), मीनाक्षी (५९), शिवगामी (५३), विजयल (५७), मीना (५८) आणि तमिलार्सी (६०) अशी त्यांची नावे आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा