गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने मध्य प्रदेश मधून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात असल्याचे समोर आल्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दारू तस्करीच्या विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिसांनी ही कारवाई केली. गुजरात राज्यात जाणाऱ्या दारूच्या विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनने महिनाभरात दुसरी मोठी कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एक पिकअप व एक इनोव्हा या दोन वाहनांमधून नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरातुन अवैध दारू घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन वेगवेगळ्या पथकासह नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात रोडवर सापळा रचून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती.
१२ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक इनोव्हा वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, पण वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे गेला. पोलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग केला. काही अंतरावर चालकाने गाडी सोडून पळ काढला. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करुन चालकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव शिवाजी बाबुलाल चौधरी असल्याचे चौकशी समोर आले. या गाडीतून २० लाख ४० हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सदरची मद्य कोणाची आहे ? याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या चौधरीकडे विचारणा केली असता, त्याने सदरचा माल हा जगतापवाडी येथे राहणाऱ्या मुकेश चौधरी याचा असल्याचे सांगीतले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मुकेश चौधरीलला घरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या घरासमोर उभी असलेल्या इनोव्हा क्रिस्टा पांढऱ्या रंगाच्या (क्रमाकं MH-43- V-6354) वाहनाबाबत विचारले असता त्याने ही गाडी आपली असल्याचे सांगितले. या गाडीची तपासणी केली असता पोलिसांना मद्य आणि रोख रक्कम मिळून २५ लाख ३० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या दोन्ही गाड्यांतून ४५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश् तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार जगदीश पवार, राजेश येलवे, दिपक गोरे, पोलीस नाईक भटु धनगर, बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, नरेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार किरण मोरे, इम्राण खाटीक, राहुल पांढारकर, अनिल बडे, युवराज राठोड यांच्या पथकाने केली आहे.