• Sat. Sep 21st, 2024

जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे ठेवणार बंद; संभाव्य टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे ठेवणार बंद; संभाव्य टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पुरेसा पाऊस नसणे आणि संभाव्य पाणी टंचाईमुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जाहीर केला. मराठवाड्यातील मोठ्या अकरा धरणात ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार जिल्ह्यांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात २६.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जून महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. विभागातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात २६.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि उद्योगांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. जुलै महिन्यात जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू होते. मात्र, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही पुरेसा पाऊस नाही. शिवाय, उर्ध्व भागातील धरणे भरली नसल्याने जायकवाडीतील आवक ठप्प आहे. पाणलोट क्षेत्रातून जायकवाडीत होणारी आवक अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून धरणाचे सर्व दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहेत. पाणीसाठा किमान ३३ टक्के होईपर्यंत दरवाजे उघडण्यात येणार नाहीत, असा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. ऑक्टोबरपर्यंत हा पाणीसाठा होईल, असे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. एकूण १६ मध्यम प्रकल्पांपैकी पाच धरणे कोरडी आहेत. लघु प्रकल्पातही पाणी नसल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पाऊस झाला आहे. पुढील आठवड्यातही दमदार पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मागील तीन वर्षे जायकवाडी धरणात पाण्याची सर्वाधिक आवक झाली होती.
शेतकऱ्यांना दिलासा! सिल्लोडच्या मिरचीला प्रति क्विंटला मिळतोय इतका भाव
आवर्तन बंदच

जायकवाडी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे देण्यात येणारे आवर्तन ३० जून रोजी बंद करण्यात आले आहे. भंडारदरा धरण ६० टक्के भरले आहे. उर्ध्व भागात संततधार सुरू असली तरी जायकवाडी धरणात आवक सुरू नाही. खरीप हंगामासाठी आवर्तन देण्याची तरतूद असते. मात्र, बैठक झाली नसल्याने आवर्तन सोडले जाणार नाही. शिवाय, धरणात कमी पाणीसाठा असल्याने दरवाजे बंद राहतील, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed