• Wed. Jun 17th, 2026

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 15, 2026
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन – महासंवाद

    रायगड-अलिबाग,दि. १५ (जिमाका): उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी संपवून, मनात नवीन आशा-आकांक्षा आणि हातात नवीन वह्या-पुस्तके घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी उत्साहात शाळेत आपले पहिले पाऊल टाकले. यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक औंक्षण करत नवोदित विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा झाला. या प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ‘पीएमश्री शाळा वहाळ’ येथे पाहायला मिळाले, जिथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शाळेतील बहुप्रतीक्षित अशा अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब‘ (IDEAL CENTER DIGITAL LAB) चे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या अत्याधुनिक प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिची डिजिटल कार्यपद्धती सविस्तरपणे जाणून घेतली.

    या डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) पद्धतीने आधुनिक शिक्षण मिळणार असून, यामुळे कठीण मानले जाणारे विषयही अत्यंत सोपे, रंजक आणि मनोरंजक होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व विशद करताना व्यक्त केला. सर्व वर्गांचा संपूर्ण अभ्यासक्रम या डिजिटल प्रणालीमध्ये आधीपासूनच उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शिक्षकांना अध्यापन करणे अधिक सोपे, परिणामकारक आणि वेळेची बचत करणारे ठरणार आहे. या प्रणालीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची विशेष सुविधा असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच तांत्रिक आणि डिजिटल कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारच्या अत्याधुनिक डिजिटल लॅब उभारण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    वहाळ शाळेत आयोजित या विशेष कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य महेश बालदी, विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, दुग्ध व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, राजिप सदस्य कमला देशेकर, अनन्या गाताडे, प्राची जाधव, हर्षदा घरत, निकिता खारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारूद्र नाळे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या संपूर्ण सोहळ्यातील सर्वात रंजक आणि संस्मरणीय टप्पा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांसह इतर विद्यार्थ्यांशी साधलेला थेट संवाद ठरला. त्यांनी सर्वप्रथम इयत्ता चौथी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांशी आणि त्यानंतर इयत्ता दुसरी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या ज्ञानाची, वाचनाची आणि एकूणच शैक्षणिक प्रगतीची अत्यंत कौतुकाने माहिती घेतली. वहाळ येथील शाळेतील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शिस्त, अभ्यासातील विलक्षण प्रगती आणि त्यांच्या ज्ञानाची प्रगल्भ पातळी पाहून मुख्यमंत्र्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले आणि शिक्षकांच्या अविरत परिश्रमांचे जाहीर कौतुक केले.

    जिल्हा परिषद शाळांमधील या गुणात्मक बदलांमुळे आता अनेक पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास पुन्हा दृढ होत असून, अनेक भागांत चक्क खाजगी शाळांमधून नाव कमी करून पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

    या संवादादरम्यान एका हुशार विद्यार्थिनीने घेतलेली मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत या डिजिटल क्रांतीची प्रत्यक्ष साक्ष देते.
    मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मूल्यधारित शिक्षणावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून, त्यांच्यात संवैधानिक मूल्ये, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा व्यापक उपक्रमांमधून उद्याचा सुजाण, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम राज्य शासन अत्यंत प्रामाणिकपणे करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच गावकरी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रिय सहभाग हा शाळांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्य कणा असल्याचे सांगत, ज्या शाळांमध्ये पालकांचा थेट सहभाग असतो त्या शाळा राज्यात आदर्श ठरतात, त्यामुळे पालकांनी शिक्षकांशी सातत्याने संवाद ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. शेवटी, या यशस्वी आयोजनाबद्दल रायगड जिल्हा परिषद, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करत जिल्हा परिषद शाळांना शंभर टक्के उत्कृष्टतेकडे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

    प्रवेशोत्सवाचे हे चैतन्य केवळ वहाळ शाळेपुरते मर्यादित नव्हते, तर जिल्ह्यातील इतरही अनेक शाळांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. मुख्य कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उरण तालुक्यातील उलवे येथील शाळेला भेट दिली. तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील राजिप शाळेला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी पनवेल तालुक्यातील पळस्पे शाळेला, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित केले. यासोबतच जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला. या प्रवेशोत्सवाच्या आनंदाश्रूंमध्ये सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि सुंदर गणवेशाचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

    या शाळा प्रवेशोत्सवाचे अतिशय नीटनेटके असे नियोजन जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

    000000000000

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed