पावसाळा उशिरा सुरू झाला असला, तरी अद्यापही शहर परिसरात व मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस नाही. मात्र तरीही ठिकठिकाणी कमी-अधिक पाणी साचून तसेच पाणी साठवणुकीच्या पद्धतीमुळे डेंगीचे डास वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच उन्हाळा संपला, तरी अनेक ठिकाणी कुलर काही काढण्यात आलेले नाहीत आणि या कुलरच्या पाण्यातूनही डेंगीची छुप्या पद्धतीने निर्मिती होते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. सद्यस्थितीत शहर परिसरातील बालरुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी हमखास वाढलेली दिसून येत आहे आणि सर्वत्र विषाणूजन्य आजारांचे रुग्ण आहेत.
या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके म्हणाले, ‘डेंगी व डेंगीसदृश रुग्ण नक्कीच वाढले आहेत आणि दिवसभरातील बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या एकूण रुग्णांमध्ये काही प्रमाणात डेंगीसदृश रुग्ण हमखास आढळून येत आहेत. त्यामुळे घरात व घराजवळ पाणी साचणार याची खबरदारी घेणे व डासांपासून बचाव करणे गरजेचे आहे.’ साधारणपणे १० ते १२ टक्के डेंगी व डेंगी सदृश रुग्ण ओपीडीत आढळून येत आहेत, असे सांगताना बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर म्हणाले, ‘डेंगीचे बहुतांश रुग्ण सौम्य आहेत आणि बहुतेक रुग्णांचे व्यवस्थापन ओपीडीच्या पातळीवर होत आहे. फार कमी रुग्णांना दाखल करण्याची वेळ येत आहे. डेंगीबरोबरच घसादुखीचा प्रकारही शाळकरी मुलांमध्ये सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवस ताप, घसादुखी, गिळायला त्रास होणे अशी लक्षणे अनेक शाळकरी मुलांमध्ये आढळून येत आहे.’
गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष नको
सध्या डेंगीचे दोन रुग्ण आमच्या रुग्णालयात दाखल आहेत, असे सांगताना बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण म्हणाले, ‘डेंगीमध्ये सुरुवातीचे काही दिवस तीव्र ताप (हायग्रेड फिव्हर) येतो आणि ताप उतरला की आजार गेला असे अनेक पालकांना वाटते. मात्र ताप उतरल्यावरही धोका असू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पोटात तसेच छातीत पाणी होणे, डोळ्यावर सूज येणे, लघवी कमी होणे, ताप उतरल्यावरही रुग्ण खूप जास्त सुस्त राहणे, अशी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.’
प्रौढांमध्येही सौम्य केसेस
तरुण मुले; तसेच प्रौढांमध्येही डेंगी व डेंगी सदृश रुग्ण वाढल्याचे फिजिशियन डॉ. आनंददीप अग्रवाल म्हणाले, मात्र गंभीर किंवा क्लिष्ट गुंतागुंत सध्या तरी दिसत नाही. तसेच दाखल करण्याची वेळदेखील फार कमी रुग्णांवर येत असल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाले.
काळजी गरजेची
– पिण्याचे पाणी साठवू नका
– निदान पाणी झाकून ठेवा
– काही दिवसांनी पाणी बदला
– कुंड्यांच्या खाली असलेल्या प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका
– कुलरमध्ये पाणी राहू देऊ नका
– घराजवळ, परसबागेत डबकी साचणार नाही, हे आवर्जून बघा
– हौद, पाण्याची टाकी उघडी ठेऊ नका, झाकण बसवाच
– डासांपासून बचावासाठी न चुकता उपाययोजना करा