• Sat. Sep 21st, 2024

रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी; हाकेच्या अंतरावर चोरी झाली तरी थांगपत्ता नाही, काय घडलं?

रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी; हाकेच्या अंतरावर चोरी झाली तरी थांगपत्ता नाही, काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : सामनगावरोडवरील रेल्वेच्या क्षेत्रीय पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळून हाकेच्या अंतरावरील ‘एसबीआय’च्या एटीएम लॉबीतील एटीएम मशीन रोख रकमेसह तीन ते चार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. ९) घडली. पहाटे साडेचार वाजता घडलेल्या या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे.

या धाडसी चोरीत ‘एसबीआय’चे डायबोल्ड कंपनीचे चार लाख रुपये किमतीचे एटीएम मशीन आणि त्यात असलेली दहा लाख १४ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १४ लाख १४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एसबीआयच्या मुख्य शाखेतील डेप्युटी मॅनेजर उज्ज्वल खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ निरीक्षक देवीदास वांजळे, सहाय्यक निरीक्षक हेमंत फड आदींसह पोलिस पथक, ठसेतज्ज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

…अशी केली चोरी

चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी प्रथम एटीएम लॉबीतील सायरन आणि इतर वायरी कापल्या. त्यानंतर एटीएम मशीनमधील रक्कम काढता न आल्याने चोरट्यांनी थेट संपूर्ण एटीएम मशीनच काढून घेतले आणि बाहेर उभ्या वाहनात टाकत पोबारा केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, घटनास्थळाच्या पाहणीनंतर पोलिस पथक तपासासाठी रवाना झाले.
चोराची हिंमत तर बघा, थेट GSTअधिकाऱ्याची तिजोरी केली साफ; चोरीची पद्धत बघून पोलिसही चक्रावले
दोन गुन्ह्यांत एकच वाहन?

नाशिकरोड येथून एटीएम पळविल्यानंतर काही तासांतच सिडकोतील माऊली लॉन्स-केवल पार्क रोडवर धाडसी घरफोडी झाली. रविवारी पहाटे घडलेल्या या दोन्ही धाडसी चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. या दोन्ही घटनांच्या फूटेजमध्ये दिसणारे वाहन एकच असल्याची चर्चा असून, त्या अंगानेही तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed