• Mon. Nov 25th, 2024

    शरद पवारांची साथ का सोडली? रोहित पवारांचं नाव घेत दिलीप वळसे पाटील यांचं मोठं वक्तव्य

    शरद पवारांची साथ का सोडली? रोहित पवारांचं नाव घेत दिलीप वळसे पाटील यांचं मोठं वक्तव्य

    आंबेगाव, पुणे : ज्याचं वय ३७ वर्षे आहे. मला आज राजकारणात येऊन ४० वर्षे झाली आहेत. माझे अनुभव पाहता त्याचं वय कमी आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं? माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे रहा. त्यामुळे या व्यतिरिक्त माझं कोणतेही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मंचर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात दरम्यान हे वक्तव्य केले आहे. डिंभे धरणाच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.

    शरद पवार की अजितदादा बारामतीवर पॉवर कुणाची? बारामतीचे स्थानिक नेते कुणासोबत?
    ईडीमुळे मी साहेबांची साथ सोडली नाही. मी जाहीर करतो. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आलेली नाही. कुठलंही वैयक्तिक हित यामागे नाही. एका विद्वानाने सांगितलं की पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून हा निर्णय घेतला. माझा आणि या डेअरीचा काडीचाही संबंध नाही. आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचा या डेअरी सोबत एक रुपयाचाही संबंध नाही. १९८८ मध्ये देवेंद्र शहा यांची आणि माझी ओळख झाली. रामकृष्ण मोरे आले तेव्हा मैत्री झाली. शरद बँकेच्या प्रमोटरमध्ये देवेंद्र शाह यांचे वडील होते, असे वळले पाटील म्हणाले.
    साहेबांची साथ सोडताना माझ्यासमोर मोठा पेच, पण…; वळसे पहिल्यांच बोलले, ईडीबाबत म्हणाले…
    एकनाथ शिंदे जेव्हा सगळे आमदार घेऊन गेले, तेव्हा दिलीप वळसे यांनी गृहमंत्री म्हणून मदत केली, असा आरोप करण्यात आला. आता साधा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे गेल्यावर माझंही पद जाणार आहे, मी ही सत्तेबाहेर असणार. उलट उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांपासून आम्ही सांगत होतो, तुमचे आमदार फुटणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना कळवलं होतं. मग मी मदत करण्याचा प्रश्न येतो कुठं? असे म्हणत वळसे पाटील यांनी आरोप फेटाळून लावला. शरद पवार यांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केला होता.

    राजकारणाचा चिखल झालाय; अजित दादांच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांचं स्पष्ट मत

    आज आपण वेगळ्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केलेलं आहे. नुकत्याच काही राजकीय घडामोडी घडल्या, त्यामाध्यमातून राज्यात नवीन समीकरण जुळून आलीत. अजितदादांच्या सोबतीने मी ही मंत्रिमंडळमध्ये सहभागी झालो. आपण हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणी ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

    पाण्यासाठी शरद पवारांची साथ सोडली?

    माझ्यासमोर मोठा पेच होता. मधल्या काळात एक घटना घडली. पाठ बंधारे विभागाकडे एक प्रस्ताव आला. डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे न्यायचं. पाणी आपली वैयक्तिक मालमत्ता नाही. अहमदनगर जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो, तेंव्हा पाण्यावरून वाद होऊ दिला नाही. मग मी पवार साहेबांकडे गेलो, दोन तीन बैठकाही झाल्या. पण ७१२ मीटर बोगद्यावर घ्यायचं ठरलं. मात्र या सरकारने निर्णय घेतला की बोगदा एकदम धरणाच्या तळाला घ्यायचा. देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव पाठवला ही आहे. डिंभे चा बोगदा जेंव्हा व्हायचा तेंव्हा होईल. आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यात जे ६५ बंधारे बांधले आहेत. हे बंधारे पावसाने भरेल तितकंच पाणी मिळेल, धरणातून पाणी मिळणार नाही, असं सरकार म्हटलं. या परिसरात पाच साखर कारखाने आहेत, मग उसाला पाणी मिळालं नाही आणि ऊस पिकले नाही तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडून जाईल. म्हणून आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मी काय हयातभर आमदार राहणार नाही. मात्र अशी परिस्थिती झाली तर आपला परिसर दुष्काळ झाल्याशिवाय राहणार नाही. हे मनाला खटकत होतं. एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवार साहेबांचे प्रेम असा पेच निर्माण झाला. काही लोक म्हणतील की सत्तेच्या बाहेर राहून ही झालं असतं. मात्र अशा कामांना सत्तेत राहणं गरजेचं असतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed