याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे मधुकर ढोले हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मधुकर हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शेतात जाण्यासाठी घरातून निघाले. गावानजिक असलेल्या गिरणा नदीपात्रातून जात असताना त्यांचा पाय घसरला. त्याच ते खाली पडल्याने बुडाले.
यावेळी ते पाण्यात पडल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पट्टीतील पोहणाऱ्या तरूणांनी नदीत उडी घेवून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती.
मयत मधुकर यांच्या पश्चात तीन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपास पो. कॉ. ईश्वर लोखंडे करीत आहे.
याठिकाणी असलेल्या गिरणा नदीतून पात्रातून अवैधपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो. यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहे. अशाच एका खड्ड्यात मधुकर ढोले बुडाले व त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी यावेळी जिल्हा रुग्णालयात केला.