जम्मूजवळील कटुआ येथे राहणारी शीतल मागील नोव्हेंबरमध्ये नागपुरात नर्सिंग प्रशिक्षणासाठी आली होती व मेडिकलमधील परिचारिका विद्यार्थिनींच्या वसतिगृहात राहात होती. ३ जुलै रोजी रात्री तिला उलटी आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी तिने मेडिकलमध्ये उपचार घेतले. डॉक्टरांनी तिला दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, ती तयार नव्हती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रकृती आणखीच खालावल्याने ५ जुलै रोजी तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रात्री तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळपासूनच नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मेडिकलच्या शवचिकित्सा गृहापुढे गर्दी केली होती.
शीतलचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची तेथे चर्चा होती. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल ३ जुलै रोजी सायंकाळी बाहेर पाणीपुरी खायला गेली होती. त्यानंतर वसतिगृहात परत आल्यावर तिला ओकाऱ्या व हगवणीचा त्रास सुरू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवचिकित्सा अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी सांगितले. शीतलचे वडील गावात शेती करतात. महाविद्यालय प्रशासनाने त्यांना दूरध्वनीद्वारे मुलीच्या मृत्यूची बातमी देताच ते पत्नी व मुलासह गुरुवारी सकाळी नागपुरात पोहोचले. मुलीच्या आकस्मिक मृत्यूने ते धाय मोकलून रडत होते.
आणखी दोघी रुग्णालयात
याच वसतिगृहात राहणाऱ्या आणखी दोन विद्यार्थिनींनाही मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. शीतलच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांची प्रकृती खालावली, मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मेडिकल प्रशासनाकडून देण्यात आली.
साश्रुनयनांनी निरोप
गुरुवारी सायंकाळी शीतलचे पार्थिव नर्सिंग वसतिगृह परिसरात आणण्यात आले. त्यावेळी अधीक्षक डॉ. कुचेवार, मेट्रन वैशाली तायडे, परिचारिका संघटनेचे शाहजाद बाबा खान व नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी तिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देत श्रद्धांजली वाहिली. शीतलच्या खोलीतील तिचे सामान बाहेर आणले त्यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. दोन दिवसांपूर्वी सोबत असणारी मैत्रीण अशी अचानक निघून गेल्याने तिच्या मैत्रिणी रडत होत्या. सायंकाळी तिचे पार्थिव जम्मूजवळील तिच्या मूळ गावी रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले.