• Sat. Sep 21st, 2024

बळीराजा हवालदिल! हंगाम संपत आला, संभाजीनगरमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, २९ टक्केच पेरणी

बळीराजा हवालदिल! हंगाम संपत आला, संभाजीनगरमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, २९ टक्केच पेरणी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मोसमी पावसाला एक महिना उशीर झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ २९.०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात पेरणीचे सर्वात कमी प्रमाण आहे.

मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पाऊस झाला नाही. पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विभागात आतापर्यंत ६३.२ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७७.४, जालना ६२.३ आणि बीड जिल्ह्यात ७२.८ मिमी पाऊस झाला आहे. पेरणीसाठी ८० ते १०० मिमी पावसाची गरज असून विभागात पेरणीला उशीर झाला आहे. सर्वाधिक क्षेत्र कापूस व मका पिकाचे आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१.५४ टक्के पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात २८.८१ व बीड जिल्ह्यात १८.३९ टक्के पेरणी झाली आहे. विभागात सरासरी पेरणी २९.०६ टक्के झाली आहे. कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ५९ हजार ३२४ हेक्टर असून आतापर्यंत तीन लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३६ टक्के पेरणी झाली आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका आणि इतर तृणधान्ये पिकांचे क्षेत्र तीन लाख ७४ हजार ६२९ हेक्टर आहे. त्यापैकी एक लाख ५३ हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ९२ हजार ७०९ हेक्टर क्षेत्र मका पिकाचे आहे. तीन जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र २० लाख ९० हजार १९८ हेक्टर आहे. त्यातील सहा लाख सात हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावरच लागवड होऊ शकली आहे. जमिनीत तीन ते चार इंच ओल असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सिंचनाच्या सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. काही भागात धूळपेरणी झाली आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती आहे.
जोरदार पावसाने अचानक पूर आला; बैलगाडीसह तीन शेतकरी गेले पुरात वाहून, एकाचा मृत्यू
उशिराच्या पावसाचा फटका

उशिराच्या पावसामुळे कडधान्य पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. येत्या १५ जुलैपर्यंत कडधान्यांची लागवड करता येणार आहे. मात्र, त्यानंतर लागवड करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. मूग, उडीद पिके बाद होणार आहेत. तूर पिकाची समाधानकारक लागवड होऊ शकते. आतापर्यंत कडधान्ये पिकांची पेरणी फक्त ९.१५ टक्के क्षेत्रावर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed