अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ३ जुलै रोजी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाने राज्य सरकारला पाठिंबा दिला असून आगामी सर्व निवडणुका आम्ही भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत लढवू, असं जाहीर केलं. मात्र एकीकडे शरद पवार हे सरकारमधील सामील होण्याच्या निर्णयाला विरोध करताना राष्ट्रवादी पक्ष सत्तेत कसा, असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला. तसंच आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत, असंही विचारलं गेलं. त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न विचारत, ‘राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार हे आपण विसरला आहात का?’ असं म्हटलं.
३ जुलै रोजी शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं सांगणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाकडून आता ३० जून रोजीच अजित पवार यांची पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असं एका प्रेस नोटच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जर ३० जून रोजीच अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे तर स्वत: अजित पवार यांनी ३ जुलै रोजी शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं का म्हटलं, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
अजितदादांचं बंड झाल्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, या प्रश्नाला शरद पवार यांनीही सकारात्मक उत्तर दिलं. दोन बंधू एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, असं पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या वतीने आज जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये काय म्हटलंय?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी दिल्ली येथे बैठक बोलावली होती. मात्र त्यांनी बोलावलेली ही बैठक बेकायदेशीर असल्याचं अजित पवार यांनी आज एका प्रेस नोटच्या माध्यमातून सांगितलं आहे. ‘आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावल्याचं मीडियातून समजलं. मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या बहुसंख्या लोकप्रतिनिधी आणि संघटनेत विविध पदांवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून ३० जून रोजी अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याने पक्षनाव आणि चिन्ह आम्हालाच मिळावं, अशी मागणी करणारी याचिका अजित पवार यांनी निवडून आयोगाकडे केली आहे. आयोगाकडे ही याचिका प्रलंबित असताना शरद पवार यांनी बोलावलेली बैठक बेकायदेशीर आहे,’ असं अजित पवार गटाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.