• Mon. Nov 25th, 2024

    पानपट्टीवाल्याचं पोर झालं फौजदार; वडिलांना मदत, दोन तास व्यायाम आणि ८ तासाचा अभ्यास

    पानपट्टीवाल्याचं पोर झालं फौजदार; वडिलांना मदत, दोन तास व्यायाम आणि ८ तासाचा अभ्यास

    सातारा : ध्येय निश्चित झालं की काहीही अशक्य नाही. असाच प्रत्यय दहिवडी येथील पानपट्टीवाल्याच्या पोराचा आलाय. त्याने वडिलांना पानपट्टीवर मदत करत फौजदार पदाला गवसणी घातली आहे. ही मदत करत दररोज दोन तास व्यायाम आणि आठ तास अभ्यास करत एमपीएससी परीक्षेत यशाचा झेंडा फडकवला आहे.

    अजिंक्य अनिल पवार हा येथील सर्वसामान्य कुटुंबातील पोरगा. वडील पानपट्टी चालवतात तर आई गृहिणी आहे. दहिवडी कॉलेजमध्ये इंग्रजी या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अजिंक्य याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर विक्रीकर निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी प्रोत्साहित केल्याने त्याने स्पर्धा परिक्षांकडे आपला मोर्चा वळवला.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २०२० साली त्याने अर्ज केला. सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्व परिक्षेत तर ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्य परिक्षेत यश संपादन केले. कोरोनामुळे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी वाट पाहवी लागली. मार्च २०२३ मध्ये शारीरिक चाचणी व मुलाखत पार पडली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ६५० जागांपैकी आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग सोडून ५८३ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात २५८ वा क्रमांक मिळवून अजिंक्यने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

    विशेष म्हणजे अजिंक्यने महाविद्यालयीन शिक्षण तसेच पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास दहिवडी कॉलेजमध्येच केला आहे. दहिवडी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करून त्याने हे यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल अजिंक्यचे रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. अनिल दडस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. व्ही. पी. गायकवाड, प्रा. बजरंग मोरे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

    माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, चंद्रकांत पवार सर यांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा केंद्राचे सहकार्य यामुळे मी हे यश मिळवू शकलो, असे अजिंक्य सांगतो. दहिवडी कॉलेज दहिवडीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे दुष्काळी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. मोठ्या शहरात खर्चिक ठिकाणी जाण्याऐवजी प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर दहिवडीतही अभ्यास करून यश मिळवता येते हे अजिंक्यच्या यशाने सिद्ध केले.

    अजितदादा, आज मन मोकळं कराच, आयुष्यभर अपमान सहन केला, ठेचा खाल्ल्या : धनंजय मुंडे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed