मुंबईतील अंधेरी लोखंडवाला, नवी मुंबईतील नेरुळ आणि कळवा आणि ठाणे येथे टोमॅटोचा दर १२० रुपयांवर पोहोचला आहे. तर, दुसरीकडे शहरातील काही भागात टोमॅटोचा दर १६० रुपयांवर पोहोचला आहे. टोमॅटोच्या किंमतींमध्ये जास्तीचीच वाढ झाल्यामुळे सद्या ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहेत त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे. मात्र, अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोसाठी १ किलोला १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत. अवकाळी पाऊस आणि सततचा होणाऱ्या पावसामुळे टोमॅटो च्या मालाला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळेच एपीएपसी मार्केट मध्ये टोमॅटोच्या गाड्यांची आवक ही कमी होत आहे. आज एपीएमसी मार्केट मध्ये १५ ते २० गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात १०० ते १२० रुपये दर झाले आहेत, तर किरकोळ बाजारात ह्यापेक्षाही जास्तीच्या दरात टोमॅटो मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टोमॅटो च्या दारांनी १५० चा भाव घेतलेला पाहायला मिळतो.
सद्या अनेक ठिकाणी सततचा पाऊस पडत आहे त्यात अगोदर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला फटका बसला होता. टोमॅटो सारख्या पिकाला जास्त जपावे लागते मात्र निसर्गाच्या पुढे कोणाचेही चालत नाही. त्यामुळे अनेक वेळा निसर्ग आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे मार्केट मध्ये कमी माल येत आहे, त्याचा परिणाम ग्राहकांना सोसावा लागत आहे.
एपीएपसी मार्केटमध्ये टोमॅटोची लाली वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. येणाऱ्या काळात जर टोमॅटोची आवक वाढली नाही तर अजून भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
टोमॅटोचे दर वाढल्याने नागरिकांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे खरेदी साठी आलेले नागरिक बऱ्याचदा भाजीपाला विक्रेत्यांवर चिडतात, कमी करून घ्या आशा विनवण्या देखील करतात. एक ग्राहक म्हणाला की किलोभर टोमॅटो घ्यायचे होते, पण भाव ऐकून फक्त पावभर घेतले आहेत. आधीच बेरोजगारी कसे तरी दोन पैसे कमवायचे त्यात एवढी महागाई की जगणं कठीण झालं आहे. त्यात अनेक जण तर टोमॅटो ची किमंत ऐकून खरेदीच कर नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात जर टोमॅटोच्या किमंती जास्त वाढल्या तर नागरिक टोमॅटो खरेदी करणार नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
टोमॅटो हा दररोज च्या जेवणात वापरला जातो मात्र त्याची किंमत पाहता इच्छा असूनही खरेदी करता येत नाही एका वस्तू ला एवढे पैसे दिले तर घर कसे चालणार, त्यामुळे सद्या टोमॅटो खरेदी करत नाही. – अर्चना बऱ्हाटे गृहिणी
राज्याचे कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी मार्च आणि एप्रिल मध्ये शेतकऱ्यांना टोमॅटोला दर कमी असल्यानं टोमॅटो फेकून द्यावे लागले होते. अवकाळी पावसानं ५६ हजार हेक्टरवरील पिकाला फटका बसला होता. त्यामुळं यंदा टोमॅटोचे दर सामान्य होण्यास तीन महिने लागतील. बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी घाऊक बाजारात टोमॅटोचा दर १०० ते ११० रुपये असल्याचं सांगितलं. तर, खारमधील किरकोळे विक्रेते राजा पाटील यांनी १६० रुपये हा विक्रमी दर असल्याचं म्हटलं.