एकीकडे महायुतीतील खातेवाटपावरून सत्तेतील शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सेखेच सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच अजित पवारांबरोबर असलेल्या दिलीप वळसे पाटलांबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंड करणार याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना होती. एकनाथ शिंदे यांच्या सूरत दौऱ्याची माहिती गुप्तचर खात्याने वळसे पाटील यांना दिली होती. पण त्यांनी मौन बाळगलं, असं सांगण्यात येत आहे. आता दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं, की त्यांना कुणी मौन बाळगायला सांगितलं? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जितेंद्र आव्हाड यांचा वृत्ताला दुजोरा
राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे समर्थक जितेंद्र आव्हाड यांनी या वृत्ताला दुजोरा देत दिलीप वळसे पाटील यांच्या हेतूंवरच शंका उपस्थित केली आहे. एवढचं नव्हे तर एकनाथ शिंदे यांना बंडासाठी लागणारी मदत वळसे पाटलांनी पुरवल्याचा संशय जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल दिलीप वळसे पाटील यांना सर्व माहिती होतं. आणि त्या बंडासाठी लागणारं सहाय्य वळसे पाटलांनी केलं. गृहमंत्री म्हणून सर्व घटनांची माहिती पोलीस देत असतात. एवढी मोठी बातमी पोलीस गृहमंत्र्यापासून कधीच लपवणार नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे शिवसेनेत बंड केलं, तशाच प्रकारच्या बंडात दिलीपी वळसे पाटलही सामील झाले. एकनाथ शिंदे यांनी दावा केला, तसाच दावा पक्ष आणि चिन्हावर (अजित पवार गट) केला जात आहे. दिलीप वळसे पाटील हे लॉ चे (LLB) विद्यार्थी आहेत आणि हुशार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचा निकाल दिलेला आहे. शिवसेनेच्या निकालात पक्ष कुणाचा, व्हिप कुणाचा लागू होणार आणि व्हिप कुणी नेमायचा? हे सगळं दिलेलं आहे. आणि हे सगळं त्यांनी समजून कसं नाही सांगितलं, याचं आश्चर्य आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं आहे.