म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…
अजित दादांच्या बंडानंतर रोहित पवारांनी हे ट्वीट केलं अन् आपले मनसुबे स्पष्ट केले. सख्ख्या पुतण्यासह विश्वासू सहकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडली असताना शरद पवार या आश्वासक चेहऱ्याची साथ रोहित पवारांनी बंडानंतर क्षणभरासाठीही सोडली नाही. पत्रकार परिषद असो, साताऱ्याचा दौरा किंवा मग शरद पवारांच्या कारमध्ये फ्रंटसीवर बसून मुंबईत येणं असो, शरद पवारांसोबत रोहित पवार सावली सारखे उभे राहिले. अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवार यांची प्रतिमा झळाळून निघाली, खंबीरपणे ताकद देणारे रोहित पवार यांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आश्वासक नेतृत्व म्हणून आपली जागा निर्माण करण्याची संधी चालून आलीये. रोहित पवारांना शरद पवारांकडून कशी ताकद मिळू शकते, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं आश्वासक नेतृत्व कसे ठरु शकतात याचा विश्लेषण…
पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन नव्या संघर्षाचा एल्गार केला. वयाच्या ८३ व्या वर्षीही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत पक्ष उभारण्याची उमेद त्यांच्या देहबोलीतून दिसत होती. यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या नातू रोहित पवार यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. काकांनी बंड केलं तरी आजोबांची साथ सोडणार नसल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित पवार राजकारण करीत असल्याचे मानले जाते.
रोहित पवारांची कारकिर्द
> रोहित पवार हे शरद पवार यांचे जेष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू
> बारामती ॲग्रो कंपनीची धुरा सांभाळली
> जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात
> २०१७ मध्ये शिर्सुफळ गुणवडी जिल्हा परिषद सदस्य
> २०१९ मध्ये रोहित पवार कर्जत-जामखेडचे आमदार
> भाजपचे मंत्री राम शिंदे यांना अस्मान दाखवंल
> २०२२ मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
> अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांना साथ
रोहित पवार यांची तुलना कायमच अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी केली जाते. मात्र रोहित पवार हे कायम वरचढ ठरताना दिसत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना शरद पवार यांच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. निवडणुकीत पराभूत होणारा पार्थ हा पवार कुटुंबातील पहिलाच सदस्य ठरले, त्यानंतर पार्थ पवार राजकारणात फारसे सक्रिय झालेच नाहीत.
त्यानंतरच रोहित पवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आणि विजयी होऊन त्यांनी पवार कुटुंबाचा वारसा पुढे नेला. अजित पवारांनी बंडखोरी भूमिका घेतली असताना आजोबांचा राजकीय पाठींबा म्हणून रोहित पुढे आले आहेत. त्यांनाही शरद पवार यांच्याकडून अनेक पदे मिळाली. भविष्यात रोहित पवार यांना आणखी नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याचे संकेत आहेत.
> संघर्षकाळात पवारांची साथ दिल्यानं पवार समर्थकांमध्ये आश्वासक नेतृत्व म्हणून प्रतिमा
> अनेक दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेल्यानं पक्षात संघटनात्मक जबाबदारी
> पक्षातील निर्णय प्रक्रियेत प्रभाव
> विधानसभेत पक्ष नेतृत्वाची संधी
> निवडणुकीच्या राजकारणात वावर वाढेल
> पक्षाचा राज्यातील नवा चेहरा म्हणून उभारी
> राज्याच्या राजकारणात नव्या नेत्याचा उदय
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांवर होणारे वार रोहित पवार निधड्या छातीनं ढाल म्हणून झेलतायत. आगामी काळात पक्षात अजित दादांसारखंच वजन रोहित पवारांनी निर्माण केलं तर त्यात नवलं वाटायला नको. पक्षातलं अजित पवारांचं स्थान रोहित पवार घेऊ शकतात का? याविषयीचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.