‘गेल्या नऊ वर्षांपासून देश-विदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लोकप्रिय आहे. महाराष्ट्र व देशाचे हित, शेतकरी, सर्वसामान्य माणूस आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार माझ्याबरोबर आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजपबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढविल्या जातील’, असे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करतानाच त्यांनी आमदारसंख्या सांगण्यास बगल दिली. मात्र, सत्तेत आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. अजित दादांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रविवारी जयंत पाटील यांनी दिला. त्यानुसार आज राष्ट्रवादीने शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातील पत्रच जारी केलं आहे.
दुसरीकडे अजित पवार यांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी उपस्थित राहिलेल्या नेत्यांनाही राष्ट्रवादीने पक्षातून बडतर्फ केलंय. पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन शपथविधिसाठी उपस्थित राहणं हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे नरेंद्र राणे, शिवाजीराव गर्जे यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचं राष्ट्रवादीने पत्रातून सांगितलं आहे. दरम्यान सरकारमध्ये सामिल झालेल्या नेत्यांवर राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे.
तत्काळ कायदेशीर अॅक्शन घ्या, सुप्रिया सुळे यांचं शरद पवार यांना पत्र
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केलंय. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर तात्काळ कारवाई करून घटनेच्या १० व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका दाखल करावी, असं पत्र राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना पाठवलं आहे.