फडणवीस यांची वक्तव्ये जाणीवपूर्वकच
‘पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच पाठिंबा होता’, या आशयाची वक्तव्ये फडणवीस यांनी काही दिवसांपासूनच जाणीवपूर्वक केली होती. शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम रविवारच्या शपथविधीआधी फडणवीस यांनी केले. त्यामुळेच रविवारी अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी त्याला कळत-नकळत राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांचाच पाठिंबा का, याची चर्चा दिवसभर सुरू होती. राजकीयदृष्ट्या चाणाक्ष फडणवीस यांची ही खेळी कुणालाही समजण्यापूर्वीच राजकीय भूकंप घडल्यामुळे आता पुढचे अनेक दिवस हा संभ्रम तसाच राहणार व भाजपचे धुरीण तो विविध मार्गांनी वाढवणार असल्याचेही बोलले जाते.
तेव्हाच खेळली चाल…
अजित पवार पक्षात गेले अनेक दिवस अस्वस्थ असल्याचे लपून राहिले नव्हते. मात्र, त्यांची अस्वस्थता त्यांनी जोवर पक्षातील पहिल्या फळीत येत नाही, तोवर समोर येऊ दिली नाही. अगदी शरद पवार यांच्या विश्वासातील दिलीप वळसे पाटील, रामराजे निंबाळकर असे दिग्गजदेखील त्यांच्यासोबत आले, तेव्हाच अजित पवार यांनी चाली खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता पुतण्यासह गेली तीन दशके जे गळ्यातील ताईत होते, त्यांच्याच विरोधात रणांगणात उतरण्याची तयारी शरद पवार यांना करावी लागणार आहे. त्यामुळे ही लढाई भविष्यात अत्यंत कटू होण्याची शक्यता अधिक आहे. या कटुतेची मानसिकता शरद पवार व अजित पवार हे दोन्ही काका-पुतणे कितपत करतात, यावरही भविष्यातील राजकीय खेळ अवलंबून असणार आहे.
अजित पवारांसोबत नेमके किती आमदार?
मुळात अजित पवार यांच्यासोबत ३० आमदार आहेत, असे त्यांचे समर्थक सांगत असले, तरी त्यांच्या नेमक्या संख्येबाबत अद्याप कुणालाही अंदाज आलेला नाही. ज्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, ते वगळता इतर आमदारांना दोन्ही बाजूंनी दूरध्वनी करणे सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांनी गेले साडेतीन वर्षे ‘राष्ट्रवादी’तील निर्णय प्रक्रियेवर घट्ट मांड बसवली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार आमच्याशी संपर्क साधत असल्याचे अजितदादा समर्थकांचे म्हणणे आहे.