राज्यातील नव्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांना अडचणीत आणले असले, तरी आपल्या तिघांची आघाडी हीच खरी भाजपच्या विरोधातील ताकद असल्याची पुरेपूर कल्पना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्यांना होती. त्यामुळेच त्यांनी आघाडीच्या बैठकांमधून लोकसभा निवडणूक आघाडीमध्येच लढविण्याच्या सूचना तळागाळातील कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यंना करायला सुरुवात केली होती. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजप आणि शिवसेना या दोघांची राज्यातील एकगठ्ठा हिंदू मते ही सर्वांत मोठी व्होट बँक असल्याने त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला होता. आता या दोघांची युती तुटल्याने त्याचा तेवढाच फटका या दोघांनाही बसणार आहे. अशावेळी शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आल्यास तिन्ही पक्षांची एकत्रित मते ही भाजपला मिळणाऱ्या मतांपेक्षा जास्त असू शकतील. त्यामुळे भाजपचा पराभव करायचा, तर आघाडी करूनच भाजपला सामोरे जाण्याचे आघाडीच्या नेत्यांनी ठरवले होते.
आघाडीच्या नेत्यांमध्ये याबाबत एकीकडे याबाबत चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातही याबाबत वेगळी चर्चा होती. लोकसभच्या जागावाटपात काँग्रेसने अधिकाधिक जागांचा हट्ट धरलाच, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लोकसभेत आघाडी करून आपण भाजपच्या विरोधात लढू, असे ठरवले जात होते. साहजिकच उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे राष्ट्रवादीचा आधार होता. मात्र भाजपला काहीही करून ही आघाडी फोडायचीच असल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या निमित्ताने आघाडीमध्ये फूट पाडली आहे.
एकट्याने सामना करण्याचे आव्हान
राष्ट्रवादीच्या फुटीला आमचा पाठिंबा नाही, असे शरद पवार यांनी कितीही सांगितले, तरी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमधील दिग्ग्ज नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत, ते पाहता पवार यांच्या राष्ट्रवादीला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे त्यांच्या फुटीचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही विपरीत परिणाम होणार आहे. आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेससोबत हातमिळवणी करायची, की स्वबळावर निवडणूक लढवायची अशा द्विधा मनस्थितीत उद्धव ठाकरे असल्याचे समजते. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाची ताकद वाढल्याने त्यांचा सामना एकट्याने करणे शिवसेनेसाठी तितकेसे सोपे उरलेले नाही.
