आज शपथविधीला ज्यांना बोलावण्यात आलेलं होतं त्यांच्या कशावर सह्या घेतल्या माहिती नाही. तिथं होते ते आमदार शरद पवारांसोबत बोलले आहेत. काही जण माझ्यासोबत बोलले आहेत. काही आमदार संभ्रमात होते मात्र आता स्पष्ट आहे. आजच्या कृतीला शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. महाराष्ट्रातील ५ तारखेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, फ्रंटल सेलचे पदाधिकारी आणि महाराष्ट्राची कार्यकारिणी या सर्वांना दुपारी १ वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी आणि राष्ट्रवादीच्या प्रांतिक बैठकीसाठी बोलावलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरला या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीत आदरणीय पवार साहेब आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडतील, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा पवार साहेबांना पाठिंबा आहे. आमच्या पक्षाचे राज्यस्तरावरचे पक्षाचे प्रतिनिधी, जिल्हा स्तरावरचे प्रतिनिधी, तालुका स्तरावरचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
सत्तेत असताना आणखी एक पक्ष फोडण्यात आला आहे. यापूर्वी शिवसेना फोडण्यात आली. ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. देशात नऊ राज्य आहेत. सत्तेत असणाऱ्या पक्षांना फोडून तिथं त्या पक्षांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. महाराष्ट्रातील युवक, महाराष्ट्राचं भलं व्हावं, प्रगती व्हावी, फोडाफोडीचं राजकारण थांबावं हे वाटणारे महाराष्ट्रातील नागरिक शरद पवार यांच्यासोबत राहतील, असं जयंत पाटील म्हणाले.
कारवाई संदर्भात विचार आणि अभ्यास केलेला नाही पण आम्ही त्यासंदर्भात पावलं टाकू, असं जयंत पाटील म्हणाले. ९ सदस्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात शपथ घेतली त्यांनी पलीकडं पाऊल टाकलं आहे. तिथं असणारे उरलेले आमदार होते त्यांना दोष देणार नाही. उरलेल्या आमदारांची भूमिका काय त्यासंदर्भात विचार करावा लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. शिंदे सरकारचे मंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं असं म्हणत जयंत पाटलांनी इशारा दिला. जेव्हा संकटं येतात तेव्हा शरद पवार ताकदीनं बाहेर पडतात, असं जयंत पाटील म्हणाले.